मृत विवाहितेच्या वैद्यकीय अहवालातून माहिती उघड
नालासोपाऱ्यातील तरुण विवाहित महिला तनुश्री डोलाई हिच्या निर्घृण हत्येचा उद्देश चोरी नसून बलात्कार असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा वैद्यकीय अहवाल आणि परिस्थितीजन्य पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी बलात्काराच्या प्रयत्नाचे कलम जोडले आहे. या प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
नालासोपाऱ्याच्या निळेगावातील डीडी कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या तनुश्री डोलाई (२३) या महिलेची ९ जुलै २०१६ रोजी गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही हत्या तिच्या दहा महिन्यांच्या तान्ह्या बाळासमोरच करण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली होती.
नालासोपारा पोलिसांनी या खळबळजनक हत्येप्रकरणी तनुश्रीच्या शेजारी राहणाऱ्या १७ वर्षांच्या अल्पवयीन तरुणास अटक केली होती. चोरीच्या उद्देशाने ही हत्या केल्याचे त्याने सुरुवातीला पोलिसांना माहिती देताना सांगितले होते. त्यानंतर या घटनेचा वैद्यकीय अहवाल पाठविण्यात आला होता.
तनुश्री हत्या प्रकरणाचा वैद्यकीय अहवाल नुकताच पोलिसांना प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार हत्येपूर्वी तनुश्रीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे. यावेळी या दोघांमध्ये झटापट झाली होती. याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीवर बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत काही नवीन कलमे दाखल केली आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

अवघ्या २ तासात गजाआड
मयत तनुश्री ही पती आणि तान्ह्या बाळासह या इमारतीत राहत होती. आरोपी १७ वर्षांचा तरुण असून तो तिच्याच शेजारी राहतो. घटनेच्या दिवशी त्याचे पालक घरात नव्हते. त्यामुळे तो बलात्काराच्या उद्देशाने घरात गेला होता. परंतु तनुश्रीने प्रतिकार करताच त्याने गळा चिरून तिची हत्या केली होती. चोरी आहे हे भासविण्यासाठी त्याने तिचा मोबाइल आणि सोनसाखळी लंपास केली होती. हत्या केल्यानंतर तो इमारतीमधील गर्दीत जाऊन उभा राहिला होता. परंतु पोलिसांना त्याच्या घरात रक्ताचा एक थेंब आढळला होता. त्यावरून संशय आला आणि अवघ्या दोन तासात पोलिसांनी त्याला अटक केली.

घटनेच्या दिवशी दीड तास आरोपीबरोबर मयत तनुश्रीची झटापट सुरू होती. त्याने बलात्काराचा प्रयत्न केल्याचे परिस्थितीजन्य पुरावे देखील आम्हाला सापडले आहेत. त्यामुळे आम्ही त्याच्यावर ही नवीन कलमे दाखल केली आहेत.
-नीलेश माईनकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे.