कल्याण : रस्त्याने पायी चाललेल्या ज्येष्ठ नागरिक महिला, पुरुषांना हेरायचे आणि दुचाकीवरून येऊन त्यांच्या गळय़ातील सोन्याचा ऐवज खेचून पळून जायचे, असे प्रकार कल्याण शहरात वाढू लागले असून सोमवारी दिवसभरात कल्याण शहराच्या विविध भागांत अशा प्रकारे घडलेल्या चार घटनांमध्ये चोरटय़ांनी चार लाख ५० हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरून नेला आहे. असाच प्रकार डोंबिवली पश्चिमेतही सुरू आहे. 

डोंबिवलीतील रेतीबंदर मोठागाव, नवापाडा गणेशनगर खाडीकिनारी परिसरातील रहिवासी, ज्येष्ठ नागरिक, महिला सकाळी आणि सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी येतात. त्यातील सोन्याचे दागिने परिधान केलेल्या व्यक्तींना हेरून चोरटे त्यांच्याकडील दागिने खेचून पळून जातात. असे प्रकार वाढले आहेत. उमेशनगर बाजारपेठेत रात्रीच्या वेळेत सोनसाखळी खेचण्याचे प्रकार वाढले आहेत. दुचाकीवरून येऊन सोनसाखळी खेचून नेण्याचे प्रकार घडत असून त्यात चोरटय़ांकडून ज्येष्ठ नागरिक ‘लक्ष्य’ केले जात आहे. असे गुन्हे रोखण्यासाठी पालिकेने शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तरीही भामटे चोरीची हिंमत करत असल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रस्त्यावरून काली त्रिवेदी (६७) हे सोमवारी सकाळी दूध आणण्यासाठी डेअरीमध्ये चालले होते. दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ाने त्यांच्या गळय़ातील ९७ हजार रूपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली. याच रस्त्यावरील म्हसोबा मैदान चिकनघर येथे अ‍ॅलन लुईस (६५) या चर्चमधील प्रार्थना उरकून घरी जात होत्या. दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांनी त्यांच्या गळय़ातील एक लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे लॉकेट हिसकावून नेले. या दोन्ही घटनांप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंधारी नदी परिसरात सकाळच्या वेळेत पतीबरोबर फिरण्यासाठी गेलेल्या विजया बामणे यांच्या गळय़ातील ७२ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी खेचून नेले. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कल्याण पूर्व येथील काटेमानिवलीतील साकेत बंगल्याजवळून लीला गोपाळकृष्ण (७८) या सोमवारी पायी चालल्या होत्या. त्या वेळी चोरटय़ांनी त्यांच्या गळय़ातील ९६ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून नेले. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांकडून जनजागृती

डोंबिवली पश्चिमेत भुरटय़ा चोरटय़ांपासून सावध राहण्यासाठी रहिवाशांनी जागृत राहावे तसेच ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्यावी यासाठी विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी विविध भागांत फलक लावले आहेत. प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत सकाळ, रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.