ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गाजवळील नदी पुलावरील मोठ्या खड्ड्यामुळे ठाणे महापालिकेच्या आपत्ती प्रतिसाद दलाच्या (टीडीआरएफ) जवानाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. विकास लहू गोरे (३१) असे मृताचे नाव आहे. जवानाच्या अपघातातील मृत्यूमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. विकास हे जिल्ह्यातील अनेक बचाव कार्यात सहभागी झाले होते. कोणत्याही दुर्घटनेमध्ये तत्परतेने धावून जाणाऱ्या जवानाचा खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्याच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ठाणे जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काही मार्गांवरील खड्ड्यांचा आकारही मोठा होऊ लागला आहे. मोठ्या खड्ड्यांमुळे काही ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मुंबई-नाशिक महामार्गाजवळील नदी पुलावर टीडीआरएफ जवान विकास गोरे चालवित असलेली दुचाकी खड्ड्यात गेल्याने अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचे दोन्ही चाक फुटले. विकास गोरे यांचा या घटनेत मृत्यू झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

भिवंडी येथे कोहिनूर इमारत पडून दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेत त्यांनी बचाव कार्यात सहभाग घेतला होता. विकास गोरे हे शहापूर येथे राहत होते. २०१९ मध्ये ते टीडीआरएफमध्ये जवान म्हणून कार्यरत होते. गोरे हे विवाहित होते. दरम्यान, टीडीआरएफ विभागाचे सचिन डुबे यांना विचारले असता, त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू होतात. विकास यांच्या मृत्यूमुळे आम्ही शोकाकूल झाल्याचे ते म्हणाले.