नवघरला जाणाऱ्या वाहनांना मार्गच नाही; ‘एमएमआरडीए’चे हात वर
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या वसईचा उड्डाणपूल अखेर शनिवारी सुरू झालेला असला तरी त्यात मोठय़ा त्रुटी असल्याची बाब समोर आली आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या ज्या वाहनांना वसईच्या नवघर पूर्व येथे जायचे असेल, त्यांच्यासाठी योग्य मार्गाचे नियोजन झालेले नाही. या वाहनांना वसंतनगरी येथून वळसा घालून जावे लागत आहे. हा पुलाच्या उभारणीतील सर्वात मोठा दोष असल्याचे वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे एमएमआरडीएने हात वर केले असून आम्ही पूल बांधला, मात्र पुढचे पालिकेने बघावे, असा पवित्रा घेतला आहे.
वसईच्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून वसई पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचीे आवश्यकता होती. त्यासाठी एमएमआरडीएतर्फे उड्डाणपूल बांधण्यात आला होता. सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा उड्डाणपूल पूर्ण झाला. तो पूर्ण होताच त्याचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली होती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करायचे होते. त्यासाठी तो खुला करण्यात येत नव्हता. नागरिकांसह चार विविध राजकीय पक्षांनी प्रतीकात्मक आंदोलनेही केली होती. अखेर शनिवारी पालकमंत्री विष्णू सावरा यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात आले. हा पूल वाहतुकीसाठी खुला झालेला असला तरी त्याचा मोठा तांत्रिक दोष समोर आल्याने वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
सध्या जुन्या पुलावरून पश्चिमेला जाण्यासाठी एकदिशा मार्ग आणि नवीन पुलावरून पूर्वेला येण्यासाठी एकदिशा मार्ग ठेवण्यात आला आहे. परंतु पूर्वेला नवघरला जाणाऱ्या वाहनांची पंचाईत होत आहे. कारण हा पूल जुन्या पुलाजवळच संपतो. तेथे पश्चिमेला जाणाऱ्या वाहनांची रांग असते, त्यामुळे पश्चिमेकडून येऊन पूर्वेला जाणे कठीण बनले आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी बॅरिकेडस लावून ठेवले आहेत. पश्चिमेकडून येणाऱ्या ज्या वाहनांना पूर्वेकडे जायचे आहे त्यांना थेट वसंतनगरी येथे जाऊन पुन्हा वळसा घालून मागे यावे लागत आहे. त्याबद्दल वाहतूक पोलिसांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुलाच्या उभारणीत हा मोठा तांत्रिक दोष असल्याचे वाहतूक पोलिसांनी सागितले.
पूल सुरू झाल्यावर वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल अशी आशा होती ती या त्रुटीमुळे धूसर झालीे आहे. कारण वसंतनगरीला जरी वळसा घालायचे ठरले तरी तेथे वाहतूक कोंडी होणार आहे.

वसई पूर्वेला जाणाऱ्या वाहनांना वसंतनगरीहून जाऊन पुन्हा मागे येणे परवडणारे नाही. सध्या आम्ही निरीक्षण करतोय. बॅरिकेडस लावले आहेत, पण याचा त्रास निश्चितच होणार आहे. निरीक्षणानंतर काय उपाययोजना करायच्या आहेत, त्याचा निर्णय घेतला जाईल.
– रणजीत पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग

एमएमआरडीएचे पालिकेकडे बोट
या तांत्रिक त्रुटीबाबत एमएमआरडीएने मात्र हात झटकले आहे. आम्ही पूल बांधून तो पालिकेला दिला आहे. वाहतुकीची कशी व्यवस्था करायची तो त्यांचा प्रश्न आहे, असे एमएमआरडीएचे उपअभियंता हणुमंत सोनावणे यांनी सांगितले. पूर्वेला जिथे पूल संपतो, तेथे पालिकेने दुभाजक उभारावे आणि पुढे चौकात सिग्नल यंत्रणा उभारावी. जेणेकरून ज्या वाहनांना पूर्वेला नवघरला जायचे आहे ते वळसा घालून येतील, असे ते म्हणाले.