मुंब्रा येथील अपघाताच्या घटनेला २४ तास उलटत नसताना मंगळवारी सकाळी ट्रान्स हार्बर मार्गावरील नेरुळ रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या तांत्रिक कारणामुळे येथील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. ठाणे, ऐरोली, तुर्भेसह महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. प्रवाशांकडून मध्य रेल्वेच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.
नेरूळ येथे मंगळवारी सकाळी ८.०३ च्या सुमारास बिघाड झाला. यामुळे हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन लोकल सेवाही काही काळ ठप्प झाली होती. अनेक लोकल वाशीवरून वळवण्यात आल्या. परिणामी, पनवेलकडे जाणाऱ्या आणि पनवेलवरून सीएमएमटी येणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.
दुरुस्तीचे काम सकाळी ८.४७ वाजता पूर्ण झाले. दुरुस्तीच्या कामात अधिक वेळ गेल्याने लोकल सेवेवर परिणाम झाला. त्यामुळे सीएसएमटी – पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा ४० ते ४५ मिनिटे उशिराने धावत आहेत. तसंच ट्रान्स हार्बर लोकल सेवाही उशीराने धावत आहे.
नवी मुंबई येथील ऐरोली, रबाळे, घणसोली आणि तुर्भे भागात मोठ्याप्रमाणात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत त्यामुळे ठाणे ते कर्जत, कसारा आणि मुलुंड, भांडूप, मुंबई उपनगरातील लाखो प्रवासी दररोज ठाणे रेल्वे स्थानकातून ट्रान्स हार्बर मार्गे नवी मुंबईत जातात. मंगळवारी सकाळी मध्य रेल्वेच्या नेरुळ स्थानकाजवळ सकाळी ८ वाजताच्या सुमारास तांत्रिक कारणामुळे बिघाड झाला होता. त्याचा परिणाम येथील रेल्वे वाहतुकीवर बसला. ठाणे रेल्वे स्थानकासह सर्वच महत्त्वाच्या स्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती. ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे गाड्या उभ्या करण्यात आल्या आहेत. प्रवाशांची नऊ, १० आणि १० अ या फलाटावर प्रचंड गर्दी झाली आहे. काही प्रवासी रेल्वे रूळावरुन चालत असल्याचे चित्र होते. फलाटावर झालेल्या गर्दीमुळे महिला प्रवाशांचे हाल झाले. रेल्वे प्रशासनाच्या कारभाराविषयी प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात होता.
नोकरदारांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. त्यामुळे अनेकांना विनाकारण लेट मार्कचा फटका बसणार आहे. काही प्रवाशांनी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील सिडको भागातून रस्ते मार्गाने नवी मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला होता.