बदलापूर: गेल्या काही दिवसांपासून उत्तरेतून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने आणि पश्चिमी वाऱ्यांचे प्राबल्य वाढल्याने ठाणे जिल्ह्यात तापमानात घट पाहायला मिळाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील सरासरी तापमान चाळीशीच्या खाली आहे. मंगळवारी जिल्ह्याचे सरासरी तापमान ३८ अंश सेल्सिअस इतके होते. ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यात दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका बसला नाही. येत्या काही दिवसात हेच तापमान कायम राहण्याची शक्यता खाजगी हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
एप्रिल महिन्यात ठाणे जिल्ह्यात तापमानाने नवनवे विक्रम प्रस्थापित केले. उत्तरेतून येणाऱ्या वाऱ्यामुळे ठाणे जिल्ह्यातील तापमानात दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर वाढ होत होती. त्यामुळे दुपारी १२ ते ४ या दरम्यान उन्हाचा चटका जिल्ह्यातील नागरिकांना बसला. समुद्रावरून येणाऱ्या पश्चिम वाऱ्यांना उशीर होत असल्याने तापमानात घट होण्यास दुपारनंतर सुरुवात होत होती. परिणामी जिल्ह्याचे तापमान चाळीशी पार जात होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून उत्तरेतून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने तापमान वाढ मर्यादित राहिली आहे. तसेच समुद्रावरून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यामुळे तापमान चाळिशीच्या आत राहत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून ठाणे जिल्ह्याचे सरासरी तापमान ३८ अंश सेल्सियस इतके आहे. मंगळवारी ही जिल्ह्याचे सरासरी तापमान ३७ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. जिल्ह्यात कोपरखैरणे येथे सर्वात कमी ३५.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर जिल्ह्यात पलावा येथे जिल्ह्यातील सर्वाधिक ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली या आठवड्यात तापमान अशाच प्रकारे चाळिशीच्या आत राहणार असून दुपारच्या सुमारास जाणवणारा कडक उन्हाळा जाणवणार नाही, अशी माहिती कोकण हवामान या खाजगी हवामान अभ्यासक गटाचे अभिजीत मोडक यांनी दिली आहे.

कोपरखैरणे ३५.७

मुंब्रा ३५.७
ठाणे ३५.८

पनवेल ३६.६
डोंबिवली ३६.८

बदलापूर ३६.८
उल्हासनगर ३७

तळोजा ३७
कल्याण ३७.४

भिवंडी ३७.६
पलावा ३७.८

कर्जत ३८.८