ठाण्याच्या वेशीवर शिलाहारकालीन अवशेष

शिवभक्त असणाऱ्या शिलाहार राजांची ठाणे ही राजधानी होती.

मनोरुग्णालय परिसरात मंदिरांच्या शिल्पशिळा

आधुनिकतेच्या झपाटय़ातही आपले प्राचीनत्व जपून ठेवलेल्या ठाणे शहरात शेकडो वर्षे जुन्या संस्कृतींच्या, इतिहासाच्या अनेक खुणा आढळून येतात. ठाणे शहराच्या प्राचीनत्वाचा असाच एक पुरावा अलिकडेच उघड झाला आहे. मुलुंड आणि ठाणे या दोन स्थानकांदरम्यान प्रस्तावित असलेल्या विस्तारित ठाणे स्थानकाच्या प्रकल्पस्थळाजवळ प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेत शिलाहारकालीन मंदिरांचे अवशेष आढळून आले आहेत. असेच आणखी अवशेष येथे जमिनीखाली गाडले गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यामुळे या परिसरात उत्खनन वा विकासकामे करताना इतिहास संशोधकांना यात सामील करून घ्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

ठाणे परिसरात अनेक ठिकाणी शिलाहारकालीन म्हणजे सुमारे हजार-बाराशे वर्षांपूर्वीच्या संस्कृतीच्या खुणा आढळून येतात. शिवभक्त असणाऱ्या शिलाहार राजांची ठाणे ही राजधानी होती. ठाणे परिसरात शिलाहारांनी अनेक मंदिरे बांधली. त्यातील अंबरनाथच्या मंदिराचा अपवाद वगळता अन्य मंदिरे आता भग्न अवशेष स्वरूपात अस्तित्वात आहेत. ठाणे जिल्ह्य़ात वस्तुसंग्रहालय नसल्याने त्यापैकी बरेच अवशेष एक तर चोरीला गेले किंवा चक्क परिसरात बांधकामाचा दगड म्हणून वापरण्यात आले. काही वर्षांपूर्वी ठाण्यात एका इमारतीसाठी खोदकाम सुरू असताना घारापुरी बेटावरील सिद्धेश्वरच्या मूर्तीसारखी एक छोटी शिल्पशिळा सापडली. ती सध्या ठाणे कलाभवनात आहे.

मनोरुग्णालय परिसरातही उत्खननानंतर मंदिराचे अवशेष सापडण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर ठाण्याच्या इतिहासाचे अभ्यासक सदाशिव टेटविलकर यांनी त्या प्राचीन शिल्पशिळा पाहिल्या. या प्राचीन शिल्पांमधील पगडीधारी महंत वैशिष्टय़पूर्ण आहे.

अशाप्रकारचे शिल्प यापूर्वी कुठेही आढळून आलेले नाही. सध्या या आवारात बरेच रान माजले आहे. ते काढून टाकल्यावर अन्य काही प्राचीन अवशेष सापडण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

आधुनिक महानगरीला प्राचीन ठाण्याची ओळख करून देण्यासाठी हे पुरावे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यातून इतिहासातील अनेक नव्या बाबी उजेडात येण्याची शक्यता आहे. शासनाच्या संबंधित विभागांनी त्याची गांभीर्याने दखल घ्यावी.

रवींद्र लाड, अध्यक्ष, कोकण इतिहास परिषद. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Temples sculpture shilahar remnant thane

ताज्या बातम्या