ठाणे : ठाण्यातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या नितीन कंपनी चौकाजवळील रस्त्याचा काही भाग बुधवारी सायंकाळी खचून त्यात टेम्पो अडकला होता. या खड्ड्यात अडकलेला टेम्पो क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आला आहे. रस्त्याच्याकडेला हे भगदाड पडले असून याठिकाणी मार्गरोधक उभारून येथील रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. उर्वरित रस्त्यावरून मात्र वाहतुक सुरु ठेवण्यात आली आहे. ठाणे शहरातील वाहतूकीसाठी नितीन कंपनी चौक महत्वाचा मानला जातो. या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते.

कामगार रुग्णालय येथून येणारा मार्ग नितीन कंपनी चौकाला येऊन मिळतो. या मार्गे वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, इंदीरानगर महात्मा फुले नगर, जय भवानी नगर, ज्ञानेश्वरनगर या भागातील नागरिक ठाणे स्थानकाच्या दिशेने वाहतूक करतात. कामगार रुग्णालयाकडून नितीन कंपनी चौकाच्या दिशेने येणाऱ्या मार्गालगतच्या दुर्गा हॉटेल समोरील रस्त्याला बुधवारी सायंकाळी चार फुट लांबीचे भगदाड पडून त्यात टेम्पो अडकला होता. टेम्पोचालक राहुल राठोड हे ठाण्याहून पुण्याच्या दिशेने जात होते. त्यावेळी ही घटना घडली.

यात कुणालाही दुखापत झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि लोकमान्य प्रभाग समितीचे उप अभियंत्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर पडलेल्या भगदाडमध्ये अडकलेला टेम्पो क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आलेला आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी धोकापट्टी लावून मार्गरोधक उभारले आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.