दुरुस्ती कामामुळे मुंबई महापालिकेकडून दोन्ही शहरांच्या पाणी पुरवठ्यात कपात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे: जिल्ह्यातील भातसा नदीच्या पात्रावर असलेल्या पिसे बंधाऱ्यातील न्युमॅटिक गेट सिस्टीममधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम मुंबई महापालिकेने मंगळवारपासून हाती घेतले असून या कामामुळे मुंबई महापालिकेकडून ठाणे आणि भिवंडी शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात प्रत्येकी दहा टक्के कपात लागू केली आहे. येत्या १० नोव्हेंबरपर्यंत हे काम सुरु राहणार असून तोपर्यंत दोन्ही शहरात प्रत्येकी दहा टक्के पाणी कपात लागू राहणार आहे. त्यामुळे ठाणे आणि भिवंडीतील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> ठाणे: कशेळी ते अंजुरफाट्यापर्यंतचा प्रवास नकोसा; रस्त्यांवरील मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक हैराण

दरम्यान, पाणी कपातीमुळे सर्वच भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होऊन नागरिकांना पुरेसे पाणी मिळणार नसून यामुळे त्यावर तोडगा म्हणून पालिका प्रशासनाने आता दररोज एका भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवून इतर भागात पुरेसे पाणी देण्याचा नियोजन आखण्यास सुरुवात केले आहे. मुंबई महापालिकाही भातसा धरणाच्या पिसे बंधारामधून पाणी उचलून त्याचा शहरात पुरवठा करते. या बंधाऱ्यातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी मुंबई महापालिकेकडून न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या दुरुस्तीचे काम ११ ऑक्टोबरपासून हाती घेण्यात आले होते. या दुरुस्ती कामाचा फटका ठाणे शहरातील पाणी पुरवठ्याला बसला होता. नदीच्या पाण्याची पातळी कमी करण्यात आल्याने ठाणे महापालिकेला बंधाऱ्यातून पुरेसे पाणी उचलणे शक्य होत नव्हते. यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर शहरातील पाणी पुरवठ्यात दहा टक्क्यांनी कपात करण्यात आली होती. २० ऑक्टोबरपर्यंत दुरुस्तीचे काम सुरु राहणार होते. परंतु तीन ते चार दिवसांनीच अचानक झालेल्या पावसामुळे नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने मुंबई महापालिकेला न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या दुरुस्तीचे काम करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे पालिकेने दुरुस्तीचे काम बंद करून कपात रद्द केली होती. आता पाऊस पुर्णपणे थांबल्यामुळे पालिकेने मंगळवारपासून न्युमॅटिक गेट सिस्टीमच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. येत्या १० नोव्हेंबरपर्यंत हे काम सुरु राहणार आहे. या कामामुळे ठाणे आणि भिवंडी शहरात प्रत्येकी दहा टक्के पाणी कपात लागू करण्यात आली असून पुढील दहा दिवस लागू राहणाऱ्या पाणी कपातीमुळे ठ ठाणे आणि भिवंडीतील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा >>> डोंबिवली : ठाकुर्ली पुलाखाली पेव्हर वाहनाची तीन चारचाकी वाहनांना धडक

दहा टक्के पाणी कपातीचा फटका ठाणे शहरातील गावदेवी, कोपरी, टेकडी बंगला, किसननगर, हाजुरी व इंदिरानगर या भागांना बसणार असून या भागात पुढील दहा दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.  त्यावर तोडगा म्हणून मुंबई महापालिकेचे दुरुस्ती काम होईपर्यंत म्हणजेच १० नोव्हेंबरपर्यंत शहरातील एका भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवायचा आणि उर्वरित सर्व भागाचा पाणी पुरवठा सुरु ठेवायचा, असे नियोजन आखण्याचे काम सुरु आहे. यामुळे नागरिकांना एकच दिवस पाणी मिळणार नाही. पण, उर्वरित दिवशी मात्र पुरेसे पाणी मिळू शकले, या उद्देशातून हे नियोजन आखले जात आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ten percent water reduction thane and bhiwandi cities water cut will be applicable till november 10 ysh
First published on: 01-11-2022 at 16:36 IST