ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तिन्ही शहरांतील धोकादायक इमारतींमधून वर्तकनगर येथील ‘दोस्ती रेंटल स्कीम’अंतर्गत घरांत स्थलांतरित करण्यात आलेल्या अनेक रहिवाशांनी ही घरे दुसऱ्या लोकांना भाडय़ाने दिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अशा घरांवर जप्तीची कारवाई करण्यासोबतच संबंधित रहिवासी आणि भाडेकरूंविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

ठाणे शहरातील झोपडपट्टय़ांच्या पुनर्विकासासाठी महापालिकेने राबवलेल्या ‘बीएसयूपी’ योजनेंतर्गत झोपडीधारकांना वर्तकनगर येथील दोस्ती भाडेतत्त्वावरील घर योजनेत निवारा पुरवण्यात आला. तसेच शहरातील धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचेही या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. मात्र, ही घरे छोटी असल्याने अनेक रहिवाशांनी सुरुवातीपासूनच दुसरीकडे स्थलांतर केले. तसेच ही घरे भाडय़ाने देण्यात आली आहेत.

यासंदर्भात पालिका प्रशासनाकडे तक्रारी आल्यानंतर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या आदेशानुसार दक्षता आणि भरारी अशी दोन पथके तयार करण्यात आली आहेत. या दोन्ही पथकांमध्ये प्रत्येकी दहा सदस्य असणार असून ठाणे पोलिसांचेही त्यांना सहकार्य असेल. हे पथक ‘दोस्ती’ योजनेतील घरांची तपासणी करून भाडय़ाने राहणाऱ्या रहिवाशांचा शोध घेणार आहे. या घरांवर जप्ती आणण्यात येईल. तसेच घर भाडय़ाने देणाऱ्या लाभार्थी रहिवासी आणि भाडेकरूंवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली. महापालिकेचे माहिती व जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.