संगनमत टाळण्यासाठी ठाणे महापालिकेचे ११ नियम

ठाणे महापालिकेत आयुक्त विरुद्ध नगरसेवक यांच्यात सुरू असलेला संघर्ष पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर मिटला असला तरी, आता प्रशासनाने पालिकेतील कामांची निविदा प्रक्रिया अधिक कडक केली आहे. काही विकासकामांच्या निविदांमध्ये संगनमत होत असल्याच्या संशयानंतर या प्रक्रियेसाठी प्रशासनाने ११ नियम जारी केले आहेत. त्यात पाच कोटींपेक्षा कमी खर्चाच्या कामांना भाववाढ न देण्यासह विविध निर्णयांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विविध कामे मंजुर करून ती पुर्ण करण्यासाठी निविदाकारांनी आपसात संगनमत करून निविदा भरल्या असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचा दावा आयुक्तांनी हे निर्णय घेताना केला आहे. या तक्रारीच्या पाश्र्वभूमीवर आयुक्त जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांची बुधवारी बैठक घेऊन त्यामध्ये ११ निर्णय घेतले. त्यामध्ये निविदाकारांनी संगनमत (रिंग) करून निविदा भरल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले तर त्या कामाच्या निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निविदा भरताना एखाद्या ठेकेदाराने सद्यस्थितीत प्राप्त होणाऱ्या निविदा दराच्या कलाशी सुसंगत दर नसणे, संगनमत करून अवाजवी दर भरणे असे प्रकार केल्याचे प्रथमदर्शनी आढळले तर त्या कामाच्या रद्द करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. जे निविदाकार जाणीवपूर्वक निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन कव्हर बिड सादर करतात आणि निविदा प्रक्रियेमध्ये रिंग करण्यास सहकार्य करतात अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा तसेच त्यांची सुरक्षा आणि इसारा अनामत रक्कम जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विविध निधींसंदर्भातील मंजुरी प्रक्रिया सुरू ठेवण्याचा निर्णय आयुक्तांनी बैठकीत घेतला आहे. ज्या निविदा नियमांनुसार योग्य नाहीत त्या कामांच्या फेरनिविदा काढण्यात येणार आहेत. ज्या कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत ती कामे यापुढे सुरू राहतील, असेही त्यांनी बैठकीत स्पष्ट केले आहे.

निर्णयांची जंत्री

* ज्या निविदाकारास किरकोळ कारणांमुळे किंवा बोगस तक्रारीच्या कारणामुळे अपात्र ठरविण्यात आले आहे. अशा सर्व कामांच्या फेरनिविदा  काढणार. निविदा अटी-शर्थीनुसार करण्यात आलेल्या संयुक्त भागीदारीचा हेतू प्रथमदर्शनी संशयास्पद वाटला तर त्या निविदांचा फेरआढावा घेण्यात येणार आहे. त्यामध्ये तथ्य आढळले तर त्या कामाच्या फेरनिविदा काढणार.

* एखादा निविदाकार एका कामासाठी पात्र ठरला आहे. मात्र त्याच निविदाकाराने इतर निविदेमध्ये दुसऱ्या निविदाकारास लाभ मिळण्यासाठी हेतूपुरस्पर कागदपत्राची पुर्तता केली नाही. तसेच ती मुळ कागदपत्रे सादर करण्यास टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आले तर त्या कामाच्या निविदा रद्द करून फेरनिविदा काढणार. निविदाकारास काळय़ा यादीत टाकणार.

* एका विशिष्ट कामासाठीच संयुक्त भागीदारी केली असल्यास आणि या भागिदारीची कायदेशीर नोंद नसल्यास निविदाकार अपात्र ठरणार. पाच कोटींपेक्षा कमी खर्चाच्या तसेच १८ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या कामासाठी कोणतीही भाववाढ दिली जाणार नाही.