कल्याण – कल्याण पश्चिमेतील मिलिंदनगर जयभीम कट्टा भागात सिध्देश उर्फ भोप्या गुंडाची दहशत वाढली असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. किरकोळ कारणावरून गुरुवारी भोप्या गुंडाने मिलिंदनगर भागात राहत असलेल्या एका रिक्षा चालकावर चाॅपरने वार करून गंभीर जखमी केले आहे.

रिक्षा चालकावर हल्ला होत असताना परिसरातील रहिवासी भोप्या गुंडाला आवरण्यासाठी आणि रिक्षा चालकाला वाचविण्यासाठी पुढे आले. त्यावेळी भोप्या गुंडाने कमरेला लावलेला चाॅपर बाहेर काढला. तो हातात घेऊन हवेत फिरवत शिवीगाळ करत, आरडाओरडा करत परिसरात नाचू लागला. या वादाच्या मध्ये कोणी पडले तर एकेका नागरिकाला मारून टाकीन, अशी धमकी देत तो रस्त्यावरील नागरिकांच्या मागे धावू लागला. हा सगळा प्रकार पाहून मिलिंदनगर भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. भोप्याकडून आपल्यावर हल्ला केला जाईल या भीतीने नागरिक पळून जाऊन घरात जाऊन दरवाजा बंद करून बसले.

या गुन्ह्याप्रकरणी कल्याण पश्चिम मिलिंदनगर विठ्ठलमंदिराच्या भागात राहत असलेले रिक्षा चालक डेन्जिल डैनी विल्यम (२३) यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुंड सिध्देश उर्फ भोप्या विरुध्द तक्रार केली आहे. पोलिसांनी मारहाण, शिवीगाळ आणि शस्त्र प्रतिबंध कायद्याने भोप्या विरुध्द गु्न्हा दाखल केला आहे. रिक्षा चालक डेन्जिल विल्यम यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की गुरूवारी संध्याकाळी सव्वा पाच वाजत मी व माझा रिक्षा चालक मित्र नितीन पवार डिवाईन हाॅटेलच्या बाजुला असलेल्या गल्लीतील रस्त्यावर रिक्षामध्ये गप्पा मारत बसलो होतो.

यावेळी तेथे मिलिंदनगर जयभीम कट्टा भागात राहत असलेला सिध्देश उर्फ भोप्या आला. त्याने आधारवाडी कारागृह येथे यापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून रिक्षा चालक डेन्जिल विल्यम यांच्या बरोबर वाद सुरू केला. डेन्जिलने त्याला हा विषय संपला आहे सांगून शांत राहण्यास सांगितले. पण भोप्याने आक्रमक भूमिका घेत डेन्जिलला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. अचानक घडलेल्या घटनेने डेन्जिल आणि त्यांचा मित्र नितीन पवार चक्रावून गेले.

पवार डेन्जिलला भोप्यापासून सुरक्षित करण्याचा प्रयत्न करू लागला. या झटापटीत भोप्याने कमरलेला लावलेला चाॅपर बाहेर काढला. तो हवेत फिरवू लागला. पवार, डेन्जिलवर हल्ला होईल या विचारातून परिसरातील नागरिक दोघांच्या बचावासाठी पुढे आहे. त्यावेळी भोप्या अधिक आक्रमक झाला. त्याने आरडाओरडा करत, शिवीगाळ करत जमलेल्या लोकांच्या मागे हातात चाॅपर घेऊन धावत परिसरात दहशत निर्माण केली. या वादात कोणी मध्ये पडले तर एकेकाला मारून टाकीन अशी धमकी देत दहशत निर्माण केली. भोप्या आपल्यावर हल्ला करील या भीतीने रिक्षा चालकांच्या मदतीसाठी आलेले लोक पळून गेले. यावेळी भोप्याने रिक्षा चालक डेन्जिल विल्यमच्या हाताच्या दंडावर चाॅपरने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

भोप्याची मिलिंदनगर भागातील दहशत वाढू लागल्याने पोलिसांनी त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहे. पोलीस उपनिरीक्षक ममता मुंजाळ याप्रकरणाचा तपास करत आहेत.