लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : येथील जोंधळे विद्यासमुहाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत शिवाजीराव जोंधळे यांची मालमत्ता हडप करण्यासाठी विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचिव गीता खरे यांच्यासह इतर चार जणांनी डोंबिवलीतील एका डॉक्टरचे बनावट शीर्षक पत्र, त्यावर चालक डॉक्टरची खोटी स्वाक्षरी, शिक्के मारून वैद्यकीय उपचाराचे प्रमाणपत्र तयार करून त्या आधारे मृत्यूपत्र तयार केले. हे प्रकरण उघडकीला आल्यानंतर शिवाजीराव यांचा मुलगा सागर यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी पाच जणांवर रविवारी गुन्हे दाखल केले आहेत.

या प्रकरणात विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचिव गीता खरे (६५), विघ्नहर्ता ट्रस्टच्या उपाध्यक्ष प्रितम देशमुख-खरे (३२), हर्षकुमार खरे (३६) (रा. डोंबिवली), संतोष देशमुख, रितेश उर्फ रविकांत पांडुरंग यशवंतराव (रा. डोळखांब, ता. शहापूर) यांच्या विरुध्द सागर जोंधळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवली पूर्वेतील ऑप्टिलाईफ रुग्णालयाचे डॉ. हेमंत इंगोले यांच्या स्वाक्षरी, शिक्क्याचे प्रमाणपत्र शिवाजीराव जोंधळे यांच्या मृत्युपत्रात जोडण्यात आले आहे. डॉ. इंगोले यांनी आपण शिवाजीराव यांना तपासले नसल्याचे आणि आपला या प्रमाणपत्राशी कोणताही संबंध नसल्याची माहिती तपास यंत्रणेला दिली आहे.

आणखी वाचा-डोंबिवलीतील सनदी लेखापाल, विकासकाकडून ज्येष्ठ नागरिक पती-पत्नीची फसवणूक

शिवाजीराव जोंधळे यांना तीन वर्षापूर्वी कर्करोग निष्पन्न झाला. त्यानंतर त्यांच्या संबंधातील आरोपी गीता खरे यांच्यासह इतर आरोपींनी शिवाजीराव यांची मालमत्ता हडप करण्याची कार्यवाही सुरू केली. यासाठी त्यांचे मृत्यूपत्र तयार करण्यात आले. हे मृत्यूपत्र तयार करणार असाल तर आम्ही तुम्हाला उपचारासाठी पुढे नेतो, अशा पध्दतीने आरोपींनी रुग्ण शिवाजीराव यांचा छळ केला. अशाप्रकारे दबाव टाकून शिवाजीराव यांच्याकडून मृत्यूपत्रावर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या, असे सागर यांनी तक्रारीत म्हटले आहे. हे मृत्यूपत्र जोंधळे कुटुंबीयांच्या अपरोक्ष तयार करून ते उच्च न्यायालयात प्रोबेटसाठी दाखल करण्यात आले होते.

शिवाजीराव यांच्या पत्नी (सागरची आई) मिळकतीच्या कामासाठी डोंबिवलीतील भावे सभागृहातील तलाठी कार्यालयात गेल्या होत्या. तेव्हा त्यांना शिवाजीराव यांचे मृत्यूपत्र तयार करून ते अगोदरच उच्च न्यायालयात आरोपींनी दाखल केले असल्याचे समजले. खरे यांच्या प्रोबेट याचिकेवर निर्णय होईपर्यंत त्यांच्या मिळकतीमध्ये कोणत्याही नोंदी करू नयेत किंवा तृतीय पक्ष अधिकार निर्माण करू नयेत, असे म्हटले होते. ॲड. संतोष झुंझारराव यांनी आरोपींचे प्रोबेट उच्च न्यायालयात दाखल केले आहे.

आणखी वाचा-भिवंडीत विसर्जन मिरवणूकी दरम्यान दगडफेक; तणावाचे वातावरण, पोलिसांकडून मध्यरात्री लाठीमार

उच्च न्यायालयातील प्रोबेटची माहिती सागर यांनी काढली. त्यावेळी त्यांना ऑप्टिलाईफ रुग्णालयाचे बनावट प्रमाणपत्र या मृत्यूपत्राला जोडले असल्याचे दिसून आले. त्यामुळे माझी व सरकारी यंत्रणांची दिशाभूल करून गीता खरे यांच्यासह इतर आरोपींनी शिवाजीराव जोंधळे यांची मालमत्ता हडप करण्यासाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्राचा वापर करून शिवाजीराव यांचे मृत्यूपत्र तयार केले. त्यांची मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सागर जोंधळे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. खरे कुटुंबीयांविरुध्द जोंधळे कुटुंबीयांकडून गुन्हे दाखल होत असल्याने खरे कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सर्व आरोपी जामिनासाठी न्यायालयात धावपळ करत आहेत.