ठाणे : मराठीच्या अस्मितेसाठी, मराठी माणसाच्या एकजुटीसाठी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडची गरज आहे. हा ब्रँड कुणीही पुसू शकत नाही, असे वक्तव्य शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते राजन विचारे यांनी ठाण्यात बोलताना केले.
हिंदी सक्तीच्या शासन निर्णय रद्द व्हावा यासाठी दोन्ही शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे हे दोन्ही बंधू आक्रमक झाले होते. महाराष्ट्रातील जनतेचा रोष आणि विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला. यापार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र विजयी मेळाव्याचे आयोजन वरळीतील एन. एस. सी. आय. डोम सभागृहात केले आहे.
या मेळाव्याच्या माध्यमातून तब्बल १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र एका व्यासपीठावर दिसणार असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरात मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्याप्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. या मेळाव्यासाठी ठाण्यातील आनंद नगर चेक नाका येथून बस गाड्या सोडण्यात आल्या तेव्हा राजन विचारे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पुढे राजन विचारे म्हणाले, महाराष्ट्र माणसाची एकजूट दाखवण्याचा आजचा हा दिवस आहे. गेले काही वर्षांपासून आपण बघतो आहे. महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला घेऊन गेले आहेत. हिंदी भाषिक आणि मराठी भाषिकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतू, महाराष्ट्रातील जनता आता सजग झाली आहे. या विजयी मेळाव्याच्या माध्यमातून मराठी माणसाच्या अस्मितेचा सुवर्ण क्षण आल्याचे मत राजन विचारे यांनी मांडले. मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न करू नका तो प्रयत्न केला तर, महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड समर्थ आहे अशा लोकांना अंगावर घ्यायला, असे मत देखील राजन विचारे यांनी मांडले.