ठाणे : घोडबंदर येथील मानपाडा भागात शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची त्यांच्याच कार्यालयात गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या हत्याकांडानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून मारेकऱ्यांना अटक करुन कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्यान, प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याकांडानंतर मानपाडा, मनोरमानगर, आझादनगर भागातील नागरिक मोठ्याप्रमाणात प्रदीप पूर्णेकर यांना ठेवण्यात आलेल्या रुग्णालयाबाहेर जमले होते. प्रदीप पूर्णेकर नेमके कोण आहेत जाणून घेऊया.
कोण होते प्रदीप पूर्णेकर – मानपाडा, आझादनगर, मनोरमानगर भागाचे प्रदीप पूर्णेकर हे ठाकरे गटाकडून प्रतिनिधीत्व करत होते. ते या तीन विभागांचे विभाग प्रमुख होते. ते आगरी समजाचे असून त्यांचे चुलत बंधू दिवंगत बाळकृष्ण पूर्णकर हे काँग्रेसचे मोठे नेते होते. परंतु काही वर्षांपूर्वी त्यांचे अपघाती निधन झाले. तर माजी नगरसेवक जयनाथ पूर्णकर हे त्यांचे सख्ये बंधू आहेत. जयनाथ पूर्णेकर हे अनेक वर्षे मानपाडा प्रभागातून निवडून येत होते. जयनाथ पूर्णेकर निवडून येण्यामध्ये प्रदीप पूर्णेकर यांचा मोठा सहभाग होता. मूळचे काँग्रेस पक्षाची विचारधारा असलेले पूर्णेकर बंधू हे शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे यांच्या पक्षात आले. त्यानंतर त्यांनी शेवट पर्यंत ठाकरे यांना पाठिंबा दिला.
याच निष्ठेमुळे नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिका निवडणूकीत प्रभाग क्रमांक तीनमधून चार जागांपैकी दोन जागांवर जयनाथ पूर्णेकर, प्रदीप पूर्णेकर यांची पत्नी विजेता पूर्णेकर या दोघांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाली होती. हा प्रभाग शिंदे गटाच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे या देखील उमेदवार म्हणून निवडणूक लढवित होत्या. ठाण्यातील सर्वाधिक हायहोल्टेज लढतींपैकी ही लढत झाली होती. प्रदीप पूर्णेकर यांनी हा प्रभाग जिंकण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. अटीतटीच्या लढतीत जयनाथ यांचा अवघ्या १५८ मतांनी पराभव झाला होता. संपूर्ण ठाण्यामध्ये सर्वात कमी मतांनी गमावलेल्या जागांपैकी ही पहिल्या क्रमांकाची जागा होती. तर विजेता यांचा २०९९ मतांनी पराभव झाला होता. नेहमी तरुणांमध्ये सहभागी – प्रदीप पूर्णेकर हे या भागातील काही तरुणांच्या मंडळांमध्ये सल्लागार किंवा त्यांना मार्गदर्शन करत असे.
त्यामुळे मानपाडा, आझादनगर, मनोरमानगर या भागातील तरुण त्यांचा चाहता होता. त्यांना आदराने ‘बाळू दादा’ म्हणून हाक मारत असे. प्रदीप यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच, शेकडोच्या संख्येने तरुणांचा गट रुग्णालयाबाहेर उभा होता. पहाटेपर्यंत तरुण, त्यांचे समर्थक रुग्णालयाबाहेरुन हलले नव्हते. निधनाचे वृत्त समजल्यानंतर तरुण आक्रमक होण्याची शक्यता असल्याने रुग्णालयाबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, पंजाबराव उगले, उपायुक्त बाळासाहेब पाटील, प्रशांत कदम, पंकज शिरसाट यासह जवळपास सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकारी उपस्थित होते. जमाव आक्रमक होऊ नये यासाठी उशीरापर्यंत त्यांच्या निधनाची माहिती दिली जात नव्हती.
समाजमाध्यमांवरही समर्थक
प्रदीप पूर्णेकर हे नेहमी फेसबुक या समाजमाध्यमावर त्यांचे व्हिडीओ, माहिती शेअर करत असे. त्यामुळे फेसबुकवर त्यांचे १३ हजाराहून अधिक फाॅलोवर्स होते. त्यांच्या आक्रमक शैलीसाठी ते परिसरात ओळखले जात होते. त्यांच्या हत्येनंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
