डोंबिवली- ठाकुर्ली-चोळे गावात ग्रामस्थांच्यावतीने त्रिवार्षिक गावदेवी जत्रा उत्सव साजरा केला जातो. या निमित्ताने गावदेवीची पालखी गावातून काढण्यात येते. जत्रेनिमित्त गावात भाविक येतात. भाविकांच्या गर्दीमुळे ठाकुर्ली पूर्व भागातील ठाकुर्ली रेल्वे स्थानक ते चोळे गावातील रस्ता मंगळवार ते बुधवारी रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, अशी माहिती डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिली.
ठाकुर्ली ते चोळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येऊन पर्यायी वाहतूक व्यवस्था वाहन चालकांसाठी करण्यात आली आहे, असे गित्ते यांनी सांगितले.
ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानकाकडून जुने हनुमान मंदिर मार्गे बंदिश पॅलेस हाॅटेल, पोशीबाई भोईर चौकाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक चोळे गावातील हनुमान मंदिर येथे बंद करण्यात आली आहे. या रस्त्याने जाणारी वाहने हनुमान मंदिरा जवळ डावे वळण घेऊन ९० फुटी रस्ता, म्हसोबा चौकातून इच्छित स्थळी जातील.
एमआयडीसी, सावित्रीबाई फुले नाट्यमंदिर, बंदिश पॅलेस हाॅटेल, घरडा सर्कलकडून, पोशीबाई चौक, ठाकुर्ली रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या वाहनांना नवीन हनुमान मंदिराजवळ विवेक ज्योत सोसायटीजवळ प्रवेश बंद करण्यात आला आहे. या रस्त्याने येणारी सर्व प्रकारची वाहने बंदिश पॅलेस हाॅटेल, ९० फुटी रस्ता, म्हसोबा चौकातून डावे वळण घेऊन जुने हनुमान मंदिर येथून ठाकुर्ली रेल्वे स्थानकाकडे जातील, अशी माहिती पोलीस निरीक्षक गित्ते यांनी दिली.