कल्याण : ठाकुर्ली उड्डाणपूल अर्थात ठाकुर्ली रेल्वे फाटक ते म्हसोबा चौक उन्नत मार्गाच्या कामाला आणखी गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडलेल्या या प्रकल्पाच्या मार्गातील बाधित रहिवाशांच्या स्थलांतराची प्रक्रिया सोमवारी सुरू करण्यात आली असून, प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या ८२ रहिवाशांचे स्थलांतर करण्यात येत आहे. सर्व रहिवाशांनी घरे रिकामी केल्यानंतर संबंधित बांधकामे निष्कासित करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून, त्यानंतर उन्नत मार्गाच्या प्रत्यक्ष उभारणीतील महत्त्वाचा अडथळा दूर होणार आहे.

ठाकुर्ली परिसरातील वाढती लोकसंख्या व वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता या मार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर बनला आहे. विशेषतः ठाकुर्ली रेल्वे स्थानक, म्हसोबा चौक व परिसरातील प्रमुख रस्त्यांवर सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या पार्श्वभूमीवर ठाकुर्ली रेल्वे फाटक ते म्हसोबा चौक या मार्गावर उन्नत मार्गाची उभारणी करून शहरांतर्गत वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. यापूर्वीही या प्रकल्पासाठी एमएमआरडीएच्या स्तरावर बैठका आणि पाठपुरावा करण्यात आला असून, प्रकल्पासाठी निधी व निविदा प्रक्रियेलाही गती मिळाली आहे.

प्रकल्पाच्या मार्गात येणाऱ्या बांधकामांमुळे प्रत्यक्ष कामाला अडथळा निर्माण झाला होता. आता ८२ बाधित रहिवाशांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू झाल्याने प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे दूर होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. घरे रिकामी झाल्यानंतर संबंधित बांधकामे हटविण्याची कारवाई करण्यात येणार असल्याने त्यानंतर उन्नत मार्गाच्या प्रत्यक्ष बांधकामाला वेग देणे शक्य होणार आहे.

ठाकुर्ली उन्नत मार्गामुळे ठाकुर्ली, डोंबिवली व कल्याण परिसरातील अंतर्गत वाहतूक अधिक गतिमान होण्यास मदत होणार असून, म्हसोबा चौक व ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कल्याण-डोंबिवलीतील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी रस्ते, उड्डाणपूल, उन्नत मार्ग व विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याच्या व्यापक प्रयत्नांचा हा महत्त्वाचा भाग आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या कामातील प्रत्यक्ष अडथळे दूर होण्यास सुरुवात झाली आहे.