डोंबिवली – ठाकुर्ली रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर सिग्नल नसल्याने लोकल थांबली होती. यावेळी दिव्यांग डब्यात बसलेल्या एका गृहसेविका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र एका भुरट्या चोराने पाठीमागून खेचून धावत्या लोकलमधून उडी मारून चोरून नेले. या महिलेच्या मानेला हिसका बसल्यानंतर आपल्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने चोरून नेल्याचे लक्षात आले.

महिलेने खिडकीतून पाहिले तर एक ३० वर्ष वयोगटातील तरूण हाताच्या मुठीत आपले हिसकावलेले सोन्याचे मंगळसूत्र घेऊन रेल्वे मार्गातून पळत होता. ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळील संरक्षित भिंतीवरून उडी मारून तो पळून गेला. मंगळसूत्राचा काही भाग महिलेच्या मानेजवळ अडकला होता.

डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात या चोरीप्रकरणी ठाकुर्ली चोळे गावात राहणाऱ्या संगीता वाघोस्कर (५०) यांनी तक्रार दाखल केली आहे. संगीता वाघोस्कर यांनी तक्रारीत म्हटले आहे, की आपले पती आजारी असतात. गृहसेविका म्हणून मी दररोज सकाळी माटुंगा येथे लोकलने कामाला जाते. गेल्या आठवड्यात मी माटुंगा येथील कामे आटोपून माटुंगा रेल्वे स्थानकातून ठाकुर्लीकडे येत होते. मी लोकलच्या दिव्यांगांच्या डब्यातील आसनावर बसले होते.

ठाकु्र्ली रेल्वे स्थानक येण्यापूर्वी सिग्नल लागल्याने लोकल काही वेळ थांबली. दुपारची वेळ असल्याने आपण लोकलमधील खिडकीवर डोके ठेऊन आपणास झोपेची गुंगी आली होती. आपल्या गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र आहे. हे ओळखून एक भुरट्या तरूणाने ते हिसकावण्याचा विचार केला. आपणास ही हालचाल माहिती नव्हती. आपण खिडकीवर डोके ठेवले असताना अचानक माझ्या मानेला जोरदार हिसका बसला.

माझ्या पाठीमागील भागातून मला कोणीतरी फटका मारला म्हणून मी पाठीमागे वळून पाहिले तर तेथे कोणी नव्हते. मी गळ्यात पाहिले तर गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र गायब झाले होते. मंगळसूत्राचा थोडासा तुटलेला भाग मानेला अडकला होता. मी खिडकीतून बाहेर पाहिले तर एक ३० वर्षाचा तरूण हातात मंंगळसूत्र घेऊन रेल्वे मार्गातून पळत होता. तो ठाकुर्ली दिशेच्या जाऊन रेल्वे मार्गालगतच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून पळून गेला. मी चोर म्हणून ओरडा केला, पण तोपर्यंत तो पळून जाण्यात यशस्वी झाला. डब्यातील इतर प्रवाशांनी हा प्रकार पाहिला.

ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या आजुबाजुला झाडेझुडपे आहेत. याठिकाणी यापूर्वी गर्दुल्ले, मद्यपी, चरसी यांचा अड्डा असायचा. याचा त्रास प्रवाशांना होत होता. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजुला संरक्षित भिंती बांधून हा भाग बंदिस्त केला आहे. त्यामुळे ठाकुर्ली रेल्वे स्थानक भागातील भुरट्या चोऱ्या थांबल्या होत्या. आता त्या पुन्हा सुरू झाल्या आहेत.