डोंबिवली – आपल्या चमत्कारीत करामती, विविध प्रकारच्या रीलमुळे सतत प्रसिध्दीच्या झोतात असलेला डोंबिवली जवळील ठाकुर्ली येथील रहिवासी असलेला विकासक सुरेंद्र पांडुरंग पाटील (५५) याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. पाटील याच्या २७ गावातील दावडी येथील बंगल्यात चपला ठेवण्याच्या फडताळात सात बंदुका, ३७१ जीवंत काडतुसे आणि १६७ एअर गनच्या बंदुका असल्याची गुप्त माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या माहितीची खात्री करून त्याच्या बंगल्यावर छापा टाकल्यावर हा सर्व शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त करून पाटीलला अटक केली.

या सर्व शस्त्रसाठ्याची बाजारातील किंंमत १० लाख रूपये आहे. हा साठा वापरण्याच्या प्रयत्नात होता, असे पोलिसांनी सांगितले. विकासक असलेला सुरेंद्र पाटील हा मागील पाच ते सहा वर्षापासून चर्चेत आला आहे. झटपट पैसे मिळवून देतो सांगून काही भोंदू बाबांनी सुरेंद्र याची लाखो रूपयांची फसवणूक केली होती. त्यानंतर मानपाडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसून सुरेंद्र याने रील तयार करून ती समाज माध्यमांत प्रसारित केली होती. या रीलवरून त्याच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

तसेच, नोकरीचे आमिष दाखवून त्याने नाशिक भागातील एका महिलेची फसवणूक केली आहे. या महिलेने स्थानिक पोलीस ठाण्यात सुरेंद्रवर विनयभंगाची तक्रार केली आहे. आपण असे काही केले नाही. आपणा विरूध्द खोटी तक्रार दाखल असल्याचे त्यावेळी सुरेंद्रने माध्यमांना सांगितले होते. या सर्व दाखल गुन्ह्यात त्याला पोलिसांनी वेळोवेळी अटक केली आहे.

भुरळ पाडणाऱ्या रील प्रसारित करून तो सतत प्रसिध्दी आणि चर्चेच्या वलयात राहतो. इंस्टाग्रामवर त्याचे तीन लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स असल्याचं समजते. यापूर्वीच्या एका दाखल गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केली होती. अलीकडेच तो जामिनावर बाहेर आला होता. अंगी रील आणि इतर माध्यमातून करामती करण्याची सवय असल्याने जामिनावर बाहेर येताच त्याने पुन्हा आपल्या कारमान्यांना सुरूवात केली होती. याची कुणकुण ठाणे गु्न्हे शाखेच्या पोलिसांना लागताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

रिव्हाॅल्व्हर, विविध प्रकारची शस्त्रे हातात घेऊन रील तयार करणे, ती प्रसारित करणे हा पाटीलचा छंद आहे. दिसायला देखणा, बोलायला करडा असल्याने पाटीलची भुरळ अनेकांना पडते. या माध्यमातून त्याचे अनुयायी वाढले असल्याचे समजते.

जवळील शस्त्रांचा वापर पाटील आपल्या दृश्यध्वनी चित्रफितीमध्ये प्राॅप्स म्हणून करत आहे. पोलीस याप्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. घरात शस्त्रसाठा सापडल्याने पोलिसांनी त्याच्यावर शस्त्र प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. त्याची रवानगी पुन्हा तुरूंगात करण्यात आली आहे.

घरातील शस्त्रसाठा त्याने कोठुन आणला. त्याचा वापर तो कुठे करणार होता. याविषयीचा चौकशी गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.