डोंबिवली : गेली दहा वर्षे ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील संतवाडी, म्हसोबा नगर झोपडपट्टीतील ८६ घरांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नामुळे या भागात पालिकेला रस्ता वा उड्डाणपूल उभारता येत नव्हता. या वस्तीतील ८६ रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे सोमवार, मंगळवारी कल्याण डोंबिवली पालिकेच्या ‘फ’ प्रभागाने संतवाडी, म्हसोबा नगर वस्तीतील उड्डाण पूल, रस्ते मार्गिकेला अडथळा ठरणारी ८६ चाळ, झोपड्यांची मागील ४० वर्षांपासूनची बांधकामे खनन यंत्राच्या (जेसीबी) साह्याने जमीनदोस्त केली.
निधी अभावी रखडपट्टी
वस्तीतील ८६ रहिवाशांना कचोरे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत घरे देण्यात आली आहेत. संतवाडी, म्हसोबा नगर झोपडपट्टीवर मागील २४ वर्षापूर्वी रेल्वे प्रशासनाने आक्रमक कारवाई करून झोपड्या जमीनदोस्त केल्या होत्या. त्यानंतर सोमवारी झालेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. ठाकुर्ली उड्डाण पुलाचा स. वा. जोशी शाळा ते ठाकुर्ली रेल्वे फाटक ते ९० फुटी रस्त्यावरील म्हसोबा चौकात उतरणारा भाग दहा वर्षांपासून रखडला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पालिका या पुलाची उभारणी करीत आहे. पालिका या पुलाच्या मार्गातील अतिक्रमणे काढून देत नसल्याने याठिकाणी एमएमआरडीएला काम करता येत नव्हते. तसेच निधी अभावी हे काम रखडले होते. हे काम मार्गी लागावे म्हणून भाजप स्थानिक आमदार, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी एमएमआरडीएकडे पाठपुरावा केला होता.
चार महिन्यांपूर्वी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन ठाकुर्ली रेल्वे फाटक उड्डाणपुलाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याचे सूचित केले होते. त्यांच्या प्रयत्नातून या कामासाठी ३६ कोटी रुपयांचा निधी पालिकेला प्राप्त झाला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
आयुक्त अभिनव गोयल यांच्या आदेशावरून अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, उपायुक्त प्रसाद बोरकर, उपायुक्त विराज लबडे, ‘फ’ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर, ‘ह’ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त अभिमान पवार, ‘ग’ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त जयराम शिंदे यांच्या उपस्थितीत अतिक्रमणविरोधी पथकाने ही बांधकामे जमीनदोस्त केली.
पुलाच्या कामाला गती
पालिकेच्या ‘फ’ प्रभाग कार्यक्षेत्रातील ठाकूर्ली रेल्वे फाटक ते म्हसोबा चौक २४ मीटर रेल्वे समांतर रस्त्यावरील महालक्ष्मी इमारतीपर्यंत १५ मीटर रुंद रस्त्यातील उड्डाणपुलाला बाधित होणारी ५८ बांधकामे सोमवारी जमीनदोस्त करण्यात आली. उर्वरित बांधकामे मंगळवारी जमीनदोस्त करण्यात आली. या भागातील रहिवाश्यांचे तातडीने स्थलांतर करून, अतिक्रमणे काढून जागा मोकळी करून देण्याचे आयुक्त गोयल यांचे आदेश होते. रहिवाशांच्या सामान वहनासाठी दोन टेम्पो प्रसाद ठाकूर यांनी उपलब्ध करून दिले होते.
नागमोडी वळणाचा पूल
ठाकुर्ली जोशी शाळेकडून रेल्वे फाटक ते म्हसोबा चौकाकडे जाणारा उड्डाणपुलाचे नागमोडी वळणाचे संकल्पचित्र पाहून अनेकांना धक्का बसला. अगोदरच ठाकुर्ली पूर्व पश्चिम जोडणाऱ्या रेल्वे मार्गावरील पुलाचा तीव्र उतार तत्कालीन पालिका बांधकाम अभियंता व एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी केला. कोणाची बांधकामे वाचविण्यासाठी या नव्या रखडलेल्या पुलाचे नागमोडी संकल्पचित्र तयार करण्यात आले आहे, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. या पुलाची लांबी एक हजार ५० मीटर व रुंदी साडेसात मीटर आहे. या पुलामुळे प्रवाशांना ठाकुर्ली हनुमान मंदिराकडून न जाता पुलावरून थेट ९० फुटी रस्त्याला जाणे शक्य होणार आहे.
आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे ठाकुर्ली रेल्वे भागातील ८६ रहिवाशांच्या पुनर्वसनाचा विषय मार्गी लावला. त्यानंतर या भागातील पुलाला अडथळा ठरणारी बांधकामे तोडण्याचे काम हाती घेण्यात आले. कचोरे येथील नवीन घरातील रहिवाशांच्या अडचणी दूर केल्या जात आहेत.-प्रसाद ठाकूर, साहाय्यक आयुक्त.
