रेल्वे अर्थसंकल्प घोषणांचा ताळेबंद
दोन दशकांपासूनच्या मागणीचा अर्थसंकल्पात समावेश करूनही निराशा
लांब पल्ल्याच्या गाडय़ांना ‘सॅटेलाइट टर्मिनस’ची केवळ घोषणाच
ठाण्यापलीकडच्या गर्दीवर उपाय म्हणून उपनगरीय गाडय़ांची संख्या वाढवल्यास त्या वेळापत्रकात लांबपल्ल्याच्या गाडय़ांचा अडथळा ठरत असतो. हा अडथळा दूर करण्यासाठी २०१५च्या रेल्वे अर्थसंकल्पात ‘सॅटेलाइट टर्मिनस’ची घोषणा केली होती. मुंबईच्या वेशीबाहेर टर्मिनस बनवून तेथून लांबपल्ल्याच्या गाडय़ांची वाहतूक करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आली आहे. उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या कल्याण स्थानकाजवळ त्यामुळे टर्मिनस बनविण्याच्या प्रक्रियेला वेग आला होता. ठाकुर्लीची जागा निश्चित करून प्रशासनाने तसा प्रस्तावही रेल्वे मंत्रालयाकडे पाठवला. घोषणा आणि निधीची तरतूद असल्याने या कामाच्या शुभारंभाची शक्यता निर्माण झाली होती. मात्र गेल्या दोन दशकांपासून मागणी होत असलेले हे टर्मिनस अद्यापही मुहूर्ताच्या प्रतीक्षेत आहे.
कल्याण टर्मिनस व्हावे ही कल्याण-डोंबिवलीकरांची जुनी मागणी आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने या मागणीकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. येथील विस्तृत जागा आणि उत्तर-दक्षिण भारताशी जोडला गेलेला रेल्वेमार्ग यामुळे या ठिकाणी टर्मिनस असावे असा नेहमीच आग्रह राहिला आहे. या आग्रहाला रेल्वेकडून सतत वेगवेगळी कारणे देऊन टाळण्याचा प्रयत्न केला जात होता. कल्याण स्थानकाजवळ पुरेशी जागा नाही असा सूर अधिकाऱ्यांनी लावला होता. अखेर मुंबईच्या गर्दीवर उपाय योजण्याच्या दृष्टीने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २०१५च्या रेल्वे अर्थसंकल्पात सॅटेलाइट टर्मिनसची घोषणा केली. तसेच ठाकुर्लीजवळच्या टर्मिनसचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले होते.
ठाकुर्ली वीज प्रकल्पाला पुनर्जीवित करण्याचा २०११-१२च्या अर्थसंकल्पामध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र पुढे तो प्रकल्प रद्द करण्यात आला.
त्यानंतर सुमारे २०० एकरची ही जागा पडून आहे. यावर टर्मिनस झाल्यास प्रामुख्याने डोंबिवलीकरांना जास्त फायदा होऊ शकतो. ‘सॅटेलाइट टर्मिनस’च्या माध्यमातून या उपक्रमाला गती मिळू शकणार होती. मात्र अद्याप हा प्रकल्प कागदावरच आहे.

रेल्वे अर्थसंकल्पामध्ये दरवर्षी घोषणा केल्या जातात, मात्र त्याची पूर्ती होत नाही. मागच्या अनेक वर्षांपासून झालेल्या अनेक घोषणा अद्याप अपूर्ण आहेत. ठाकुर्ली टर्मिनसची अवस्थाही तशीच असून पुढील काही वर्षे यासाठी अशीच प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
– जितेंद्र विशे, उपनगरीय एकता संघ, उपाध्यक्ष

कल्याण-डोंबिवलीकरांच्या दृष्टीने ठाकुर्ली येथे टर्मिनस होणे अत्यंत गरजेचे असून त्याचा फायदा लाखो प्रवाशांना होणार आहे. ही चांगली घोषणा गेल्यावर्षी झाली असली तरी ती अद्याप पूर्ण होण्याच्या दृष्टीने कोणतीच हालचाल झालेली दिसत नाही. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नव्या घोषणा करण्यापेक्षा जुन्या घोषणाच मार्गी लावण्याची गरज आहे. कारण नव्या घोषणा नवे वाद सोडवण्यामध्ये यंत्रणा गुंतून राहण्यापेक्षा केलेल्या घोषणांच्या पूर्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
– सौरभ मजली, कल्याण