डोंबिवली – रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट आणि एव्हरग्रीन सायकल रॅली ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळीथॅलेसेमिया आजार, नेत्रदान आणि पर्यावरण संवर्धनविषयक लोकसंदेश देण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. डोंबिवली शहर परिसरातील १०० हून अधिक सायकल स्वारांनी उत्स्फूर्त सहभाग घेत या तीनही उपक्रमांबाबत सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.या रॅलीची सुरुवात सकाळी साडे सहा वाजता डोंबिवली एमआयडीसीतील रोटरी भवन येथून झाली. क्लबचे अध्यक्ष अथर्व जोशी, सचिव सुबोध पटवर्धन यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ झाला. डोंबिवली पूर्व भागातील विविध रस्त्यांवरून मार्गक्रमण करत सायकलस्वारांनी नेत्रदानाची गरज, थॅलेसेमिया प्रतिबंध आणि पर्यावरण संवर्धनाबाबत विविध संदेश फलकांतून जनजागृती केली. सकाळी साडे सात वाजता रोटरी भवन येथे रॅलीची सांगता झाली.

रॅलीनंतर सहभागी सायकल स्वारांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. क्लबचे अध्यक्ष अथर्व यांनी उपस्थितांना रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. वैद्यकीय प्रकल्प संचालक डॉ. भक्ती लोटे यांनी नेत्रदानाचे महत्त्व यावेळी उपस्थितांना सांगितले. डाॅ. लोटे यांनी एमआयडीसीतील आश्रय रुग्णालय येथे नुकत्याच सुरू झालेल्या रोटरी–आश्रय नेत्रदान केंद्राची माहिती उपस्थितांना दिली. केवळ नेत्रदानाचा संकल्प न करता, आपल्या कुटुंबीयांशी याबाबत संवाद साधून मृत्यूनंतर प्रत्यक्ष नेत्रदान करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन डाॅ. लोटे यांनी केले. रोटेरियन ज्येष्ठ डॉ. माधव बैतुले यांनी थॅलेसेमिया या आनुवंशिक रक्तविकाराबाबत मार्गदर्शन केले. थॅलेसेमियापासून बचावासाठी जनजागृती, योग्य तपासण्या आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

तसेच थॅलेसेमिया रुग्णांना सातत्याने रक्ताची आवश्यकता असल्याने नियमित रक्तदान करून त्यांना मदत करण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. पर्यावरण प्रकल्प संचालक रोटेरियन सतीश अटकेकर यांनी पर्यावरण संरक्षणाचा संदेश देताना प्लास्टिकचा वापर कमी करणे, पाण्याची बचत करणे आणि निसर्गाचे संवर्धन करणे यासाठी प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या शेवटी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या १०० हून अधिक सायकल स्वारांना पदकांचे वाटप करण्यात आले.

पदक वाटप प्रसंगी क्लबचे अध्यक्ष अथर्व जोशी, सचिव सुबोध पटवर्धन, वैद्यकीय प्रकल्प संचालक डॉ. भक्ती लोटे, पर्यावरण प्रकल्प संचालक रोटेरियन सतीश अटकेकर, रॅली प्रकल्प अध्यक्ष संतोष भणगे, प्रकल्प सह-अध्यक्ष शुभांगी मगर, थॅलेसेमिया प्रकल्पाचे प्रांत समन्वयक डॉ. माधव बैतुले, माजी अध्यक्ष रघुनाथ लोटे, एव्हरग्रीन सायकल क्लबच्या प्रमुख हर्षल सरोदे, उमा सिंग, मानस पिंगळे, विश्राम परांजपे, वासंती पाटील, राकेश मेहता, सुजाता, संजय जोशी, तसेच रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टचे इतरही अनेक सदस्य उपस्थित होते. १०० हून अधिक सायकलस्वारांचा उत्स्फूर्त सहभाग लाभलेली ही रॅली केवळ सायकल रॅली न राहता एक प्रभावी जनजागृती अभियान ठरली. उपक्रमाची यशस्वी सांगता करताना काही सायकल स्वारांनी त्वरित नेत्रदानासाठी संमतीपत्रे भरून दिली.