ठाणे : ठाणे शहरातील अंतर्गत भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाला शहरातील विविध सामाजिक संस्था आणि गृहनिर्माण संस्थांनी विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पाच्या विरोधात रविवारी ‘ठाणे अगेन्स्ट इंटर्नल रिंग मेट्रो’ या नागरिक मंचाच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत कलाकार, डॉक्टर, वकील यांच्यासह विविध क्षेत्रांतील नागरिकांनी सहभागी होत प्रकल्पाला विरोध नोंदविला.
ठाणे शहरातील घोडबंदर, वागळे इस्टेट, बाळकूम आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत शहरातील रस्ते अरुंद असल्याने विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे सध्या सुरू आहेत. वडाळा-घाटकोपर-कासारवडवली मेट्रो मार्गिका (मेट्रो-४), ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिका (मेट्रो-५), तसेच घोडबंदर सेवा रस्त्यांचे मुख्य रस्त्यात समावेशीकरण अशा विविध कामांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकल्पांच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचा आरोपही पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यातच अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पामुळे ठाणेकरांवर आर्थिक बोजा पडेल आणि हा प्रकल्प ‘पांढरा हत्ती’ ठरेल, असा आरोप करीत यापूर्वीही विविध संघटनांनी आंदोलने केली आहेत. रविवारी पोखरण रोड क्रमांक -२ येथे ‘ठाणे अगेन्स्ट इंटर्नल रिंग मेट्रो’ या नागरिक मंचाकडून स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. या वेळी नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून प्रकल्पाला विरोध दर्शविला.
स्वाक्षरी मोहिमेत एक हजाराहून अधिक नागरिकांनी केलेल्या स्वाक्षऱ्यांवरून ठाणेकरांना अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प नको असल्याचे स्पष्ट होते. हा प्रकल्प म्हणजे नागरिकांच्या पैशांची निव्वळ उधळपट्टी असून, त्यासाठी हिरव्यागार पर्यावरणाचा विनाश केला जात आहे, असा आरोप मोहिमेच्या आयोजक ॲड. राधिका राणे यांनी केला.
ठाणेकरांच्या मूलभूत समस्या सोडविण्याऐवजी त्यांच्यावर हा अनावश्यक प्रकल्प लादला जात आहे. नागरिकांचा लोकशाही मार्गाने व्यक्त झालेला स्पष्ट विरोध प्रशासनाने लक्षात घेऊन प्रकल्पाचे काम तातडीने थांबवावे. प्रशासनाने नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात हे जनआंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा आयोजक आदेश मेहरोत्रा यांनी दिला.
