ठाणे : पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यामुळे संतापलेल्या एका व्यक्तीच्या हल्ल्यात दीड वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळवा येथील शांतीनगर भागात २२ वर्षीय तक्रारदार हे त्यांची पत्नी चार वर्षांची मुलगी आणि दीड वर्षाच्या मुलासोबत वास्तव्यास आहेत. याच भागात त्यांची मेव्हणी देखील वास्तव्यास आहे. रविवारी रात्री परिसरात राहणाऱ्या विकी डॅनियल नावाच्या व्यक्तीसोबत त्यांच्या मेव्हणीचे वाद झाले होते. याची माहिती तक्रारदार यांना मिळाल्यानंतर ते पत्नीसोबत मेव्हणीच्या घरी गेले.
तेथे डॅनियल याची पत्नी आणि तक्रारदार यांच्या मेव्हणीमध्ये वाद सुरु होते. तक्रारदार पोहचताच डॅनियल याच्या पत्नीने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. डॅनियल याने स्वत:च्या हाताने स्वत:वर ब्लेडने वार केले. तक्रारदार यांनी तात्काळ ११२ या पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला संपर्क साधला.
कळवा पोलीस आल्यानंतर त्यांनी तक्रारदार यांना पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार, तक्रारदार हे त्यांची पत्नी आणि दीड वर्षांच्या मुलासह दुचाकीने पोलीस ठाण्यात गेले. सोमवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास ते पोलीस ठाण्यात तक्रार देऊन परतत असताना कळवा पूर्व येथील रिक्षा थांब्याजवळ डॅनियल हा एका हातात कोयता आणि दुसऱ्या हातात सुरा घेऊन उभा होता.
पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यामुळे डॅनियल याने तक्रारदार यांच्या दिशेने धाव घेत त्यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. हा वार तक्रारदार यांनी चुकविल्याने तो त्यांच्या दीड वर्षांच्या मुलाला लागला. यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर डॅनियल याने पुन्हा एकदा तक्रारदार यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
परंतु तक्रारदार यांनी दुचाकी वेगाने नेत तेथून पळ काढला. तसेच मुलाला कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
