ठाणे : ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा सहज आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ठाणे जिल्ह्यात ३८१ ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ सुरू करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील २४४ ग्रामपंचायतींमध्ये ही केंद्रे सुरू करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत असून, अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड आणि शहापूर तालुक्यांतील ग्रामीण भागाचा यामध्ये समावेश आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय दाखले, प्रमाणपत्रे तसेच विविध ऑनलाइन सरकारी सेवांसाठी तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्हा मुख्यालयात वारंवार जावे लागते. यामुळे वेळ आणि पैसा खर्च होण्याबरोबरच अनेकदा एका कामासाठी नागरिकांना अनेक हेलपाटे मारावे लागतात. ही अडचण कमी करण्यासाठी गावाच्या जवळच ‘आपले सरकार सेवा केंद्र’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाहिरात काढण्यात आली आहे. ‘आपले सरकार सेवा केंद्र’ हे नागरिकांना विविध शासकीय सेवा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देणारे केंद्र आहे. उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, विविध दाखले, शासकीय योजनांसाठी अर्ज, शैक्षणिक व इतर ऑनलाइन सेवांशी संबंधित कामांसाठी नागरिकांना या केंद्रांचा उपयोग होणार आहे.
विविध विभागांशी संबंधित सेवा नागरिकांना या माध्यमातून उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी या केंद्रांमुळे मोठी सोय होणार आहे. ऑनलाइन अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत किंवा संबंधित शासकीय संकेतस्थळावर प्रक्रिया कशी पूर्ण करायची, याची माहिती नसलेल्या नागरिकांना केंद्राच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य मिळणार आहे. त्यामुळे डिजिटल सेवांचा लाभ घेणेही नागरिकांना अधिक सुलभ होणार आहे. शासकीय सेवा गावाच्या पातळीवर उपलब्ध झाल्याने नागरिकांचा प्रवासाचा खर्च आणि वेळ वाचणार आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अथवा शैक्षणिक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली ऑनलाइन कामे, विविध प्रमाणपत्रांसाठीचे अर्ज तसेच शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया स्थानिक पातळीवर करता येणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विस्तार मोठा असून, शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यांतील अनेक गावांमध्ये नागरिकांना शासकीय कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. अशा गावांमध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ उपलब्ध झाल्याने प्रशासनाच्या सेवा नागरिकांच्या अधिक जवळ पोहोचण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील २४४ ग्रामपंचायतींमध्ये ३८१ केंद्रे सुरू करण्याच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शासकीय सेवांच्या डिजिटल उपलब्धतेला मोठी चालना मिळणार आहे. ‘शासकीय कार्यालयात जाऊन सेवा घेण्याऐवजी सेवा नागरिकांच्या गावातच पोहोचविणे’ या दृष्टिकोनातून ही केंद्रे ग्रामीण नागरिकांसाठी महत्त्वाची ठरणार आहेत.
तालुका केंद्र
अंबरनाथ – २७
कल्याण – ११५
ठाणे – ४ भिवंडी – १११ मुरबाड – ७६
शहापूर – ४८
