भिवंडी येथील शासकीय अनुदानित शाळेत विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी ३५०० रुपयांची मागणी करणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापकांसह तिघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. मुख्याध्यापक (माध्यमिक) दिपक लेले (५५), मुख्याध्यापक (प्राथमिक) आत्माराम वाघ (५७) आणि शिक्षक सुरेश कुलकर्णी (५२) अशी ताब्यात असलेल्यांची नावे असून त्यांच्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी येथील शांतीनगर भागात दादासाहेब दांडेकर हे शासकीय अनुदानित विद्यालय आहे. तक्रारदार यांच्या पुतण्याला या विद्यालयात आठवीच्या इयत्तेत प्रवेश घ्यायचा होता. त्यामुळे तक्रारदार हे विद्यालयात गेले असता त्यांच्याकडून ३ हजार ५०० रुपयांची मागणी करण्यात आली. यानंतर तक्रारदार यांनी थेट ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी आणि गुरूवारी याप्रकरणाची पडताळणी केली असता दिपक, आत्माराम आणि सुरेश यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.