ठाणे : रमझान ईद निमित्ताने कपडे खरेदीसाठी दुचाकीने निघालेल्या ५५ वर्षीय व्यक्तीचा गुरुवारी रात्री मुंबई नाशिक महामार्गावर अपघाती मृत्यू झाला. मो. मुस्तफा मो. अली शेख असे मृताचे नाव असून याप्रकरणी ट्रेलर चालक सुरेश गौड याच्याविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

खडवली भागातील राया परिसरात मो. मुस्तफा मो. अली शेख हा राहत असून तो भिवंडीतील एका कंपनीत कामाला होता. गुरुवारी सुट्टी असल्याने मुस्तफा आणि त्याच्या मित्रांनी रमझान ईद निमित्ताने कपडे खरेदी करण्याचे ठरविले होते. गुरुवारी रात्री १०.३० वाजता ते राया येथून भिवंडीच्या दिशेने निघाले होते. मुस्तफा याच्यासोबत मोहम्मद शाह हा एका दुचाकी वरुन निघाला होता. शाह हा दुचाकी चालवित होता. तर मुस्तफा दुचाकीच्या मागे बसला होता. दुसऱ्या एका दुचाकीने त्यांचे आणखी दोन मित्र त्यांच्यासोबत जात होते. रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास भिवंडी येथील भोईर गाव परिसरात ते पोहचले असता मुस्तफा प्रवास करत असलेल्या दुचाकीला भरधाव ट्रेलरची धडक बसली. त्यामुळे मुस्तफा आणि शाह हे दोघेही दुचाकीवरून खाली पडले.

मुस्तफा याच्या डोक्यावरून ट्रेलरचे चाक गेल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. तर शाह याला किरकोळ दुखापत झाली. मुस्तफा याला त्याच्या मित्रांनी पडघा येथील सरकारी रुग्णालयात नेले असता, डाॅक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. या अपघाताप्रकरणी ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.