ठाणे : ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने हिंदी वेबसिरीज आणि भोजपूरी चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रीला अटक केली आहे. ही अभिनेत्री वेश्या व्यवसाय चालवित असून पोलिसांनी तिच्या तावडीतील दोन मुलींची सुटका केली आहे. वागळे इस्टेट येथील एका बार आणि रेस्टाॅरंटमध्ये अभिनेत्री काही महिला आणि मुलींना वेश्या व्यवसायासाठी घेऊन येणार असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे, शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास बार आणि रेस्टाॅरंटमध्ये सापळा रचला. अभिनेत्री तेथे पोहचली असता, पोलिसांनी तिला तात्काळ अटक केली. तसेच तिच्या तावडीतून दोन महिलांची सुटका केली.या अभिनेत्रीने १० वेबसिरीज आणि तीन भोजपूरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्याविरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम १४३ (१), १४३ (३) सह स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम सन १९५६ चे कलम ४ आणि ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिला अटक केली आहे.