ठाणे : ठाणे महापालिका मुख्यालयात विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांना अधिकारी भेटत नसल्याच्या तसेच अधिकारी कार्यालयाबाहेर जाताना नोंदवहीत नोंदही करत नसल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या. अशाच स्वरुपाची तक्रार काँग्रेस पक्षानेही पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे काही दिवसांपुर्वी केली होती. या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी अखेर एक परिपत्रक काढून अभ्यागतांसाठी भेटीची वेळ ठरविण्याबरोबर बाहेर जाताना नोंद करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना आता अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्या समस्या मांडणे शक्य होणार आहे.
ठाणे महापालिकेचे मुख्यालय पाचपाखाडी भागात असून येथूनच पालिकेचा कारभार चालतो. याशिवाय, नागरिकांना विविध कामांसाठी मुख्यालयात यावे लागू नये यासाठी पालिकेने शहरात नऊ ठिकाणी प्रभाग समिती कार्यालये उभारलेली आहेत. असे असले तरी अनेकदा प्रभाग समिती कार्यालयातून कामे मार्गी लागत नाहीत किंवा समस्या सोडविल्या जात नाहीत. त्यामुळे नागरिकांना पालिका मुख्यालयात बसणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे समस्या मांडण्यासाठी यावे लागते. यात नागरिकांसह राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश असतो.
अनेकदा पालिकेतील अधिकारी विविध प्रकल्पांच्या ठिकाणी पाहाणीसाठी किंवा इतर कामांसाठी कार्यालयाबाहेर निघून जातात. अनेक अधिकारी तशी नोंदवहित नोंद करत नाहीत. त्यामुळे अधिकारी नेमके कोणत्या कामासाठी गेले, याची नागरीकांना माहिती मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना त्यांची वाट पाहात उभे रहावे लागते. काही अधिकाऱ्यांनी अभ्यागतांसाठी भेटीची वेळ निश्चित केलेली नाही. यामुळे अधिकारी कार्यालयात उपस्थित असले तरी बैठकांमुळे ते नागरिकांना भेट नाकारतात. यामुळे नागरिकांना आपल्या समस्या मांडणे शक्य होत नसल्याच्या तक्रारी पुढे येत असतानाच, काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर प्रवक्ते राहुल पिंगळे यांनीही अशाच स्वरुपाची तक्रार पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती.
ठाणे महापालिकेत वाढती अनियमितता, अधिकारी-कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, नागरिकांकडे दुर्लक्ष आणि माहितीचा अधिकार कायद्याचे उल्लंघन या तक्रारींमुळे नागरिक त्रस्त झाले होते. वेळेत अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसणे, भेट मिळाल्यास नागरिकांचे म्हणणे न ऐकणे, तसेच आरटीआय कलम ४ (१) नुसार अनिवार्य माहिती वेबसाईटवर आणि दर्शनी भागात न लावणे अशा तक्रारी सातत्याने वाढत आहेत. अशा स्वरुपाची तक्रार प्रवक्ते पिंगळे यांनी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे दिली होती. या तक्रारीनंतर अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी महापालिकेच्या सर्व विभागांना शिस्त लावण्यासाठी परिपत्रक काढले असून, यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांवरील जबाबदारी आणखी वाढली आहे. त्याचबरोबर त्यामुळे नागरिकांना आता अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्या समस्या मांडणे शक्य होणार आहे.
केंद्र शानसाचा माहितीचा अधिकार अधिनियम २००५ प्रमाणे १७ बाबींची माहिती कलम ४ (१) नुसार संकेतस्थळ, फलकावर तिमाही अद्ययावत करणे. नागरिकांनी मागणी केल्यास सर्व अभिलेखांचे अवलोकन सहज उपलब्ध करून देणे. प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाकडे अभ्यागतांना अभिप्रायासाठी अर्ज ठेवणे. अभ्यागतांसाठी निश्चित भेटीची वेळ राखून ठेवणे आणि कार्यालयाबाहेर फलकावर तसे नमूद करणे. पुरेसा वेळ देऊन नागरिकांचे म्हणणे ऐकून घेणे. कार्यालयात हालचाल नोंदवही ठेवणे आणि अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडताना नोंदवहीत नोंद करणे. कार्यालयातून बाहेर पडताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वातानुकूलीत यंत्रणा, दिवे, पंखे बंद करणे. नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी, निवेदने आणि पत्रव्यवहारावर शासनाच्या परिपत्रकानुसार विहित मुदतीत कार्यवाही करणे. कार्यालयीन वेळेत ओळखपत्र आणि गणवेश परिधान करणे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी दिले आहेत.
प्रतिक्रियाकाही निवडक अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षम आणि हलगर्जी वागणुकीमुळे नागरिकांची गैरसोय होत होती. त्याचबरोबर महापालिकेची प्रतिमा मलिन होत होती. या परिपत्रकामुळे आता शिस्त, पारदर्शकता आणि नागरिकांसाठी दिलासा या तिन्ही गोष्टींमध्ये मोठी सुधारणा होईल. – राहुल पिंगळे, मुख्य प्रवक्ता, ठाणे शहर काँग्रेस
