ठाणे : शिवसेना विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाणे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात ठाण्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सुसंस्कृत ठाणे शहरात दिवसाढवळ्या हत्यांसारख्या गंभीर घटना घडत असून, गुंडगिरीचे प्रकारही वाढत असल्याची चर्चा आहे.

सोशल मीडियावरील रील्सच्या माध्यमातूनही गुंडगिरीचे प्रदर्शन केले जात असल्याने चिंता व्यक्त होत आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर विविध राजकीय पक्षांचे नेतेही अस्वस्थ झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच नागरिकांच्या सुरक्षेसह विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी दुपारी २ वाजता ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे ही सर्वपक्षीय पत्रकार परिषद होणार असून, यामध्ये विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी ठाणे शहरातील परिस्थितीबाबत आपली भूमिका मांडणार आहेत.