ठाणे : ठाण्यात उभारल्या जाणाऱ्या ॲमेझॉनच्या डेटा सेंटरसाठी करण्यात आलेल्या वृक्षतोडीवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कंपनीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सर्व वृक्षतोड कायद्याचे पालन करून आणि ठाणे महापालिकेची अधिकृत परवानगी घेऊनच करण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे.
बाळकुम येथील प्रस्तावित ॲमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पास गृहनिर्माण संस्था, स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी तसेच विविध सामाजिक संघटनांनी आक्षेप घेत प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी, ध्वनी व वायू प्रदूषण, पाणी आणि वीज वापरावर अतिरिक्त ताण येणार आहे, असा दावा नागरिक करत आहेत. या संदर्भात त्यांनी नुकतीच खासदार नरेश म्हस्के यांची भेट घेऊन चर्चा करत प्रकल्प रद्द करण्यासाठी आणि बेसुमार वृक्ष तोडीची चौकशी करण्याचे निवेदन दिले. त्यानुसार, खासदार म्हस्के यांनी ठाणे महापालिका आयुक्त आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
दरम्यान, ॲमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या वृक्षतोडीबाबत कंपनीने अधिकृत निवेदन जारी केले आहे. यात प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या आणि पर्यावरणीय मंजुरी घेण्यात आल्या असून त्यांचे सातत्याने पालन केले जात आहे. संबंधित मंजुरी आणि कागदपत्रे केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या ”परिवेश” पोर्टलवर सार्वजनिकरीत्या उपलब्ध असल्याचेही कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
तोडण्यात आलेल्या प्रत्येक झाडाच्या बदल्यात साइटवर त्यापेक्षा अधिक स्थानिक प्रजातींची झाडे लावली जात असल्याचा दावा कंपनीच्या प्रवक्त्यांनी केला आहे. डेटा सेंटरसाठी लागणारा वीजपुरवठा स्थानिक निवासी किंवा व्यावसायिक ग्राहकांच्या वीजग्रिडमधून केला जाणार नसून, वीज कंपनीच्या समन्वयाने उभारण्यात येणाऱ्या स्वतंत्र उच्च-दाब (हाय-व्होल्टेज) सबस्टेशनद्वारे केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पाण्याच्या वापराबाबतही कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. ठाणेसह भारतातील आपल्या डेटा सेंटरमध्ये कूलिंगसाठी पाण्याचा वापर केला जात नाही. तसेच, स्थानिक नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचाही वापर कूलिंगसाठी केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात अत्याधुनिक डेटा सेंटरद्वारे गुंतवणूक करत असल्याचा अभिमान व्यक्त करताना कंपनीने आपण भारतात ”वॉटर पॉझिटिव्ह” झाल्याचेही सांगितले. म्हणजे कंपनी जितके पाणी वापरते, त्यापेक्षा अधिक पाणी विविध उपक्रमांद्वारे समाजाला परत करते. आरोग्य, सुरक्षा आणि पर्यावरणाच्या सर्वोच्च मानकांचे पालन करत ऊर्जा व पाण्याचा वापर कमी करण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टिकोन अवलंबल्याचे कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.
