ठाणे : तलावपाली परिसरातील आम्रपाली बार अँड रेस्टाॅरंटमध्ये पुन्हा एकदा पोलिसांच्या कारवाईनंतर चर्चेत आला आहे. या बारमध्ये नौपाडा पोलिसांनी छापा टाकून महिला वेटर, ग्राहक आणि बारमधील कर्मचारी अशा ३२ जणांविरोधात कारवाई करुन गुन्हा दाखल केला आहे. २०२१ मध्ये याच आम्रपाली बारमध्ये करोना नियमांचे उल्लंघन करुन ऑक्रेस्ट्रा बार सुरु असल्याचे आढळून आले होते. यानंतर प्रशासनाने राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि ठाणे पोलीस दलातील तत्कालीन दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई झाली होती.

तलावपाली परिसरात आम्रपाली बार अँड रेस्टाॅरंट आहे. १३ जूनला रात्री बारमध्ये महिला वेटर तोकडे कपडे परिधान करुन ग्राहकांसमोर विभत्स वर्तन करत असल्याची माहिती नौपाडा पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे १३ जूनला रात्री ११.५० वाजता नौपाडा पोलिसांच्या पथकाने बारच्या दोन्ही प्रवेशद्वारातून बारमध्ये प्रवेश केला. त्यावेळी मोठ्या आवाजात वाद्य वाजविली जात होती. तसेच, महिला वेटर ग्राहकांजवळ जाऊन विभत्स वर्तन करत होत्या. यानंतर पोलिसांच्या पथकाने प्रकार थांबवून महिला वेटरची चौकशी केली. एकूण २३ जणींना पथकाने ताब्यात घेतले. त्यानंतर पथकाने बारच्या दोन व्यवस्थापकांसह नऊ कर्मचाऱ्यांची चौकशी करुन त्यांना ताब्यात घेतले. या बारमध्ये मुलुंड, वागळे इस्टेट, लोकमान्यनगर भागातील पाच ग्राहक उपस्थित होते. पोलिसांनी या कारवाईत ७०० रुपयांची रोकड जप्त केली.

२०२१ मध्ये याच आम्रपाली बार अँड रेस्टाॅरंटमध्ये नियमांचे उल्लंघन सुरु होते. याचे चित्रीकरण प्रसारित झाल्यानंतर राज्य शासनाने ठाणे पोलीस दलातील दोन वरिष्ठ अधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचे निलंबन केले होते.