ठाणे – अमली पदार्थांच्या निर्मूलनासाठी आणि त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध पातळ्यांवर उपाययोजना करण्यात येत असून, या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय नार्को-को-ऑर्डीनेशन सेंटर समितीची महत्वाची बैठक पार पडली. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदिप माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील अमली पदार्थांची उपलब्धता, तस्करी, सेवन तसेच त्याविरोधात करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. तर आगामी काळात अमली पदार्थांच्या विळख्यात तरुण पिढी अडकू नये यासाठी शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था तसेच तरुणांमध्ये विशेष जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या.

अमली पदार्थांच्या सेवनाचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम लक्षात घेता केवळ कारवाईपुरते मर्यादित न राहता व्यापक जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देण्याचे निर्देश यावेळी संबंधित विभागांना देण्यात आले. अमली पदार्थांच्या विळख्यात तरुण पिढी अडकू नये यासाठी शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था तसेच तरुणांमध्ये विशेष जनजागृती मोहीम राबविण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. माने यांनी सांगितले. अमली पदार्थांचे सेवन, त्याचे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम, व्यसनाधीनतेमुळे व्यक्ती आणि कुटुंबावर निर्माण होणारे सामाजिक व आर्थिक परिणाम तसेच अमली पदार्थांपासून दूर राहण्याबाबत विद्यार्थ्यांना आणि तरुणांना सातत्याने मार्गदर्शन करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यासाठी शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून व्याख्याने, मार्गदर्शनपर कार्यक्रम, समुपदेशन आणि विविध जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात आला. अमली पदार्थांची तस्करी आणि अवैध विक्री रोखण्यासाठी पोलीस विभागाने अधिक प्रभावीपणे कारवाई करावी, तसेच संशयास्पद हालचाली आणि अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवावे, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. अमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक परिणामकारक होण्यासाठी पोलीस विभागासह अन्न व औषध प्रशासन, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाने परस्पर समन्वयाने काम करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. विविध विभागांकडे उपलब्ध असलेल्या माहितीचा योग्य पद्धतीने वापर करून अमली पदार्थांच्या तस्करीची साखळी रोखण्याबरोबरच सेवन करणाऱ्या व्यक्तींपर्यंत प्रतिबंधात्मक आणि पुनर्वसनात्मक उपाय पोहोचविण्यावरही भर देण्यात आला.

प्रतिबंधित औषधांचा गैरवापर रोखण्यासाठी औषधविक्री केंद्रांवर नियमितपणे तपासणी करण्यात यावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. वैद्यकीय कारणांशिवाय किंवा वैध डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय प्रतिबंधित औषधांची विक्री होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आले. औषधांच्या विक्रीमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना केवळ दोषी म्हणून पाहण्याऐवजी त्यांना व्यसनमुक्तीच्या प्रक्रियेत आणणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले.

व्यसनाधीन व्यक्तींसाठी उपलब्ध असलेल्या समुपदेशन व पुनर्वसन केंद्रांच्या माध्यमातून प्रभावीपणे उपचार, समुपदेशन आणि पुनर्वसनाची प्रक्रिया राबविण्याबाबतही चर्चा झाली. व्यसनाधीन व्यक्तींना आवश्यक वैद्यकीय उपचार आणि मानसिक आधार मिळावा, यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. दरम्यान, अमली पदार्थांविरोधातील लढा केवळ प्रशासन किंवा पोलिस यंत्रणेपुरता मर्यादित न राहता त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग आवश्यक आहे. विशेषतः पालकांनी आपल्या मुलांच्या वर्तनातील बदलांकडे लक्ष देणे, त्यांच्या मित्रपरिवाराबाबत जागरूक राहणे आणि अमली पदार्थांच्या सेवनासंदर्भात कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास संबंधित यंत्रणेशी संपर्क साधणे गरजेचे आहे. तरुण पिढीला अमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, नागरिक आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.