ठाणे : मध्यप्रदेशातून मेफेड्राॅन या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या चौघांना ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. या अमली पदार्थांचे उत्पादन, विक्री, साठवणूकीमध्ये आणखी कोण सहभागी होते का, याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

बब्बु खिजहार खान उर्फ इम्रान (३७), वकास अब्दुलरब खान (३०), ताकुद्दीन रफीक खान (३०) आणि कमलेश चौहान (२३) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी मध्यप्रदेशातील रहिवासी आहेत. ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून शोध मोहीम सुरु होती. अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमित सपकाळ यांना मिळालेल्या माहितीनुसार ३ नोव्हेंबरला पथकाने ठाण्यातील चरई भागात सापळा रचून इम्रान, वकास, ताकुद्दीन आणि कमलेश या चौघांना ताब्यात घेतले. पोलीस पथकाला त्यांच्याकडे १ किलो ७१ ग्रॅम ६ मिलीग्रॅम वजनाचा एमडी हा अमली पदार्थांचा साठा आढळून आला.

त्यांच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी वाहनासह २ कोटी २४ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मध्यप्रदेशात सराईत

– यातील इम्रान आणि कमलेश हे सराईत आहेत. इम्रान याच्याविरोधात मध्यप्रदेशातील धरमपुरी येथे चार, नागलवाडी, कसरावद, रावजी बाजार येथे प्रत्येकी एक असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत. तर कमलेश याच्याविरोधात धामनोद या पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे दोन गुन्हे दाखल आहेत.

चौकट ही कामगिरी पोलीस अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, उपायुक्त अमरसिंह जाधव, साहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र दौंडकर यांच्या सूचनेनुसार अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल म्हस्के, साहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, सोमनाथ कर्णवर-पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र निकम, दिपक डुम्मलवाड, पोलीस हवालदार अमोल देसाई, हरिष तावडे, अभिजीत मोरे, अजय सपकाळ, शिवाजी रावते, अमोल पवार, संदीप चव्हाण, नंदकिशोर सोनगिरे, अमित सपकाळ, हुसेन तडवी, गिरीष पाटील, पोलीस नाईक अनुप राक्षे, शिल्पा कसबे, पोलीस शिपाई कोमल लादे, आबाजी चव्हाण यांनी केली आहे.