ठाणे : आसनगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक हिरामण तरवारे यांच्यावर तीन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावाने घरपट्टी करुन देण्यासाठी ग्रामसेवकाने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे.
तक्रारदार यांनी आसनगाव भागात घर विकत घेतले होते. त्याची घरपट्टी तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावाने करायची होती. २९ ऑक्टोबरला तक्रारदार हे ग्रामपंचायतीत गेले असता, ग्रामसेवक हिरामण यांनी त्यांच्याकडून पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर पथकाने याप्रकरणाचा तपास सुरु केला.
पथकाने पंच साक्षीदार यांच्या समक्ष पडताळणी कारवाई केली असता, हिरामण यांनी एका पंचा समक्ष तक्रारदार यांच्याकडे कायदेशीर मोबदल्या व्यतिरिक्त ३ हजार ५०० रुपयांच्या आणि तडजोडी अंती तीन हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी त्यांच्याविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
