kidnap attempt thane : बदलापूर येथील शाळेमध्ये लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली असतानाच, शुक्रवारी वर्तकनगर येथे अडीच वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीच्या आईने त्या व्यक्तीला पाहताच, त्याने मुलीला सोडून तेथून पळ काढला. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर वर्तकनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा – Badlapur School Case : अत्याचारानंतर वैद्यकीय तपासणीसाठीही चिमुकलीची फरफट
वर्तकनगर येथे एमएमआरडीएच्या रेंटल इमारती आहेत. विविध प्रकल्पात बाधित झालेल्या नागरिकांना येथे भाडेतत्त्वावर सदनिका देण्यात आल्या आहेत. या इमारतीमध्ये अडीच वर्षीय मुलगी तिच्या कुटुंबासोबत राहाते. शुक्रवारी सकाळी ती घराजवळील मोकळ्या जागेत खेळत असताना एक २५ ते ३० वयोगटातील व्यक्ती त्या ठिकाणी आला. मुलीला उचलत तो तेथून निघू लागला. त्याचवेळी मुलीच्या आईने हा प्रकार पाहिला. मुलीच्या आईने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या व्यक्तीने मुलीला तिच्या आईच्या अंगावर ढकलले आणि तेथून पळ काढला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वर्तकनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच आरोपीचा शोध सुरू केला. याप्रकरणात मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या घटनेनंतर वर्तकनगर भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.