बदलापूर: ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणात रविवारी सकाळपर्यंत ८९ टक्के पाणी जमा झाले होते. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या २४ तासात सात टक्के पाण्याची भर धरणात झाली. त्यामुळे समाधान व्यक्त केले जाते आहे. शनिवारी २४ तासात धरण क्षेत्रात सुमारे २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे बारवी धरण ८२ टक्क्यांवरून थेट ८९ टक्क्यांपर्यंत पोहोचले.

ठाणे जिल्ह्यातील बहुतांश महापालिका, नगरपालिका आणि औद्योगिक वसाहतींना बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेले बारवी धरण पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरावे अशी सर्वांची आशा असते. त्यामुळे वर्षभर उद्योग आणि पिण्यासाठी आवश्यक पाणी उपलब्ध होते. यंदाच्या वर्षात कडक उन्हाळ्यामुळे बारवी धरणाची पाणी पातळी २५ टक्क्यांपर्यंत खाली आली होती. त्यानंतर जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने धरण क्षेत्रातील साठा समाधानकारक नव्हता. मात्र जुलै महिन्यात पावसाने संततधार का होईना धरणाच्या पाणी पातळीत वाढ केली. सुरुवातीचे तीन आठवडे संथगतीने बारवी धरणात पाणी साठा झाला. मात्र जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे बारवी धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला. २४ ते २६ जुलै या तीन दिवसात बारवी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. २३ जुलै रोजी बारवी धरणात ५१ टक्के इतका पाणीसाठा होता. तर २६ जुलै रोजी धरणात ६८ टक्के पाणीसाठा होता. या तीन ते चार दिवसाच्या पावसामुळे बारवी धरण वेगाने भरले. मात्र त्यानंतर पुन्हा पावसाने उघडीप दिल्याने बारवी धरण संथ गतीने भरत होते. शनिवारी बारवी धरण क्षेत्रात सुमारे २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे बारवी धरणाच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाली.

हेही वाचा : ठाणे जिल्ह्याची चौफेर कोंडी; वसई फाट्यावर ट्रक उलटल्याने १५ तास वाहतूक ठप्प

बारवी धरणात शनिवारी ८२ टक्के पाणीसाठा होता तर रविवारी हा पाणीसाठा ८९ टक्क्यांवर पोहोचला. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास येत्या काही दिवसात बारावी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची अशा व्यक्त होते आहे. रविवारी बारवी धरणाची पाणी पातळी ७१.४० मीटर पर्यंत होती. धरणात सध्या ३०१ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत हा पाणीसाठा कमीच आहे. गेल्यावर्षी ४ ऑगस्ट रोजी बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले होते.