ठाणे : येथील बाळकुम भागातील प्रस्तावित अमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी, ध्वनी व वायू प्रदूषण, पाणी तसेच वीज वापरावर अतिरिक्त ताण येणार असल्याने त्यास स्थानिकांकडून विरोध होत असतानाच, या प्रकल्पात एकूण ३१६ वृक्ष बाधित होणार असल्याची बाब पुढे आली आहे. यापैकी ११२ झाडे तोडण्यास तर, २०४ झाडे पुनर्रोपित करण्यास पालिकेने तीन वर्षांपुर्वीच परवानगी दिली आहे. मात्र, याठिकाणी परवानगीपेक्षा अधिक वृक्ष तोड झाल्या आरोप सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांनी केल्याने हा प्रकल्प आता वादात सापडला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षात विविध प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली. यामध्ये मेट्रो, अंतर्गत मेट्रो, ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग, आनंदनगर ते साकेत उन्नत मार्ग, बाळकुम ते गायमुख खाडीकिनारी मार्ग तसेच इतर प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांत बाधित होणाऱ्या हजारो वृक्षांच्या तोडीस पालिकेने यापुर्वीच परवानगी दिली असून यामुळे शहरातील हरित पट्टा काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. या वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून पालिकेच्या कारभारावर टिका होत असून पर्यावरणप्रेमींसह राजकीय पक्षांनी आंदोलने करत नाराजी व्यक्त केली होती. असे असतानाच, आता बाळकुम भागातील प्रस्तावित अमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पात बाधित होणाऱ्या वृक्षतोडीस पालिकेने तीन वर्षांपुर्वीच परवानागी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
बाळकुम भागातील प्रस्तावित अमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी, ध्वनी व वायू प्रदूषण, पाणी तसेच वीज वापरावर अतिरिक्त ताण येणार असून यामुळे या प्रकल्पास स्थानिक नागरिकांसह विरोधी पक्षाकडून विरोध होत आहे. असे असतानाच, या प्रकल्पातील वृक्षतोडीस परवानगी दिल्याचा मुद्दा पुढे आला आहे. विशेष म्हणजे, शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी या प्रकल्पाच्या बेसुमार वृक्षतोड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आणल्याने हा प्रकल्पच वादात सापडला आहे.
नागरिकांचा विरोध
बाळकुम येथील प्रस्तावित ॲमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी, ध्वनी व वायू प्रदूषण, पाणी आणि वीज वापरावर अतिरिक्त ताण येणार आहे. गृहनिर्माण संस्था, स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींचा या प्रस्तावित प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. बाळकुम येथे प्रस्तावित ॲमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पाबाबत लोढा हासीया क्लब, फेअर फील्ड को. ऑ. हाऊसिंग सोसायटी, व्हीएफव्हीए को. ऑ. हाऊसिंग सोसायटी व इतर गृहनिर्माण संस्था, स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी तसेच विविध सामाजिक संघटनांनी आक्षेप घेत प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे.
स्थगिती, चौकशीची मागणी
गृहनिर्माण संस्था, स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी तसेच विविध सामाजिक संघटनांनी खासदार नरेश म्हस्के यांची नुकतीच भेट घेऊन चर्चा करत प्रकल्प रद्द करण्यासाठी आणि बेसुमार वृक्ष तोडीची चौकशी करण्याचे निवेदन दिले. या निवेदनाची गंभीर दखल खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिका आयुक्त आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन सार्वजनिक हित लक्षात घेऊन या प्रकल्पास तात्काळ स्थगिती यावी तसेच प्रकल्पा ठिकाणी बेसुमार वृक्षतोड करण्यात आल्याने संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
कोणती झाडे बाधित
अमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पासाठी ठाणे महापालिकेने दिलेल्या परवानगीनुसार एकूण ३१६ बाधित वृक्षांपैकी २०४ वृक्षांचे पुनर्रोपण आणि ११२ वृक्ष तोडण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पुनर्रोपणासाठी सर्वाधिक अशोक (असुपालव) ५४, गुलमोहर ३५, जांभूळ १३, उंबर १२, देशी बदाम १२, सोनमोहर १२, वड ९, रेनट्री ८, पिंपळ ७, कॉर्डिया ६, चारकोल ट्री ६, ऑस्ट्रेलियन बाभूळ ५ आदी वृक्षांचा समावेश आहे. तर तोडण्यास मंजुरी मिळालेल्या झाडांमध्ये आंबा ३९, मृत वृक्ष २७, सुबाभूळ २२, चिंच ८, रॉयल पाम ८, नारळ ४ तसेच प्रत्येकी एक देशी बदाम, एक फणस, एक चारकोल ट्री आणि एक वड (उन्मळून पडलेले) यांचा समावेश आहे.
महापालिकेच्या आदेशानुसार या २०४ वृक्षांचे पुनर्रोपण करणे बंधनकारक असून, भरपाई म्हणून ४,९५८ वृक्षांची लागवड अपेक्षित आहे. त्यापैकी प्रकल्प परिसरात २,२०९ वृक्षांची मियावाकी पद्धतीने लागवड करण्यात येणार असून, उर्वरित २,७४९ वृक्षांसाठी २ कोटी ७४ लाख रुपयांचा वृक्षनिधी जमा करण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली.
बाळकुम भागातील प्रस्तावित अमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पासाठी बेसुमार वृक्षतोड करण्यात आल्याची तक्रार खासदार नरेश म्हस्के यांनी केली असून या संदर्भात त्यांचे पत्र आम्हाला प्राप्त झाले आहे. याबाबत फेर तपासणी करून अहवाल सादर करण्यात येईल.
- मधुकर बोडके, उपायुक्त, ठाणे महापालिका
