शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या महिला आघाडीने माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. ‘पूर्णेकरांना न्याय मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही,’ असा इशारा महिला आघाडी प्रमुख रेखा खोपकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आरोपांचे खंडन केल्यानंतर ठाकरे गटाच्या महिला आघाडीने पत्रकार परिषद घेत त्यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवण्यावरून होत असलेल्या टीकेलाही खोपकर यांनी उत्तर दिले. ‘मृतदेहाची विटंबना करण्याचा आमचा उद्देश नव्हता. पोलिसांकडून पहिल्या एफआयआरच्या नोंदणीमध्ये झालेल्या विलंबामुळे कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला,’ असा दावा त्यांनी केला. तसेच या प्रकरणात राजकारण आणण्याचा आरोपही त्यांनी फेटाळला. पूर्णेकर यांच्या हत्येला चार दिवस उलटूनही परिसरातील नागरिक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी काही व्यक्तींविषयी संशय व्यक्त केल्यानंतर त्यांच्या नावांचा एफआयआरमध्ये समावेश करण्यात आला. या नावांसाठी पक्षाच्या नेत्यांनी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप महिला आघाडीने फेटाळला. कुटुंबीयांनीच संशय व्यक्त करून संबंधित नावांचा एफआयआरमध्ये समावेश करण्याची मागणी केली होती, असा दावा करण्यात आला. आज आमचा एक धडाडीचा कार्यकर्ता आणि विभागप्रमुख गेला आहे. त्याला न्याय मिळेपर्यंत पक्ष संघटना, नेते आणि ठाण्यातील नागरिक गप्प बसणार नाहीत,’ अशी भूमिका महिला आघाडीने मांडली.

दिशा सालियान प्रकरणाचा संदर्भ

महिला उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे यांनी पत्रकार परिषदेत दिशा सालियन प्रकरणाचाही उल्लेख केला. त्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले असले तरी न्यायालयीन प्रक्रियेत त्यांना आरोपी ठरवण्यात आलेले नसल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणाचा पूर्णेकर हत्या प्रकरणाशी थेट संबंध नसल्याचे सांगत त्यांनी दोन्ही प्रकरणे वेगळी असल्याचे स्पष्ट केले.

राजकारण प्रत्येकाच्या जीवनात आणू नका

पूर्णेकर हत्या प्रकरणावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये राजकारण न आणता कुटुंबीयांची व्यथा समजून घ्यावी, असे आवाहन शिवसेना (उबाठा) पक्षाच्या महिला उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे यांनी केले. ‘पक्ष आणि राजकारण बाजूला ठेवा. त्या कुटुंबाची व्यथा ऐकण्याचा प्रयत्न करा. हा माणुसकीचा प्रश्न आहे,’ असे तरे म्हणाल्या. पूर्णेकर यांच्या हत्येनंतर संबंधित परिसरातील लोकप्रतिनिधींनी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी व्हायला हवे होते, असेही त्यांनी सांगितले. ‘घराशी पूर्वीपासून संबंध असल्याचे सांगितले जात असेल, तर त्या संबंधांची आठवण ठेवून कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी व्हायला हवे होते,’ असा टोलाही त्यांनी लगावला.