ठाणे – गेल्या काही महिन्यांपासून राज्यात ठाकरे ब्रँडची चर्चा सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही ठाकरे बंधु एकत्र येणार याची उत्सुकता आहे. हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द झाल्यामुळे मराठीचा विजयी मेळावा साजरा करण्यासाठी तब्बल १८ वर्षानंतर ठाकरे बंधूंना एकत्र एका व्यासपीठावर पाहता येणार आहे. त्यांच्या या विजय मेळाव्याचे बॅनर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदार संघ असलेल्या वागळे इस्टेट भागात लावण्यात आले आहेत. त्यामुळे ठाकरे येत आहेत… अशा चर्चा आता सर्वत्र रंगू लागल्या आहेत.
‘महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या अस्तित्त्वासमोर आमची भांडणे, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणे आणि एकत्र राहणे, यात काही कठीण आहे, असे वाटत नाही’ असे वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या युट्यूब वाहिनीवरील ‘वास्तव मे ट्रुथ’ या पाॅडकास्ट कार्यक्रमात केले होते. यास उद्धव ठाकरे यांनीही साद दिल्याचे दिसून आले होते.
यानंतर ठाकरे बंधू एकत्र येणार का, याच्या चर्चा समाजमाध्यमांवर, कार्यकर्त्यांच्या गप्पांमधून रंगू लागल्याचे पाहायला मिळाले होते. तसेच ठाणे शहरात काही ठिकाणी ठाकरे बंधूच्या एकत्र येण्यासाठी बॅनर उभारले होते. परंतू, त्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून याबाबत अधिकृतरित्या जाहीर झाले नसले तरी, हिंदी सक्तीच्या शासन निर्णय रद्द व्हावा यासाठी दोन्ही बंधू आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
शासनाने हा निर्णय रद्द करावा यासाठी या दोन्ही बंधूंनी एकत्र मोर्चाची हाक दिली होती. या मोर्चात ठाकरे बंधू एकत्र दिसणार होते. परंतू, महाराष्ट्रातील जनतेचा रोष आणि विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र विजयी मेळावा घेण्याचे जाहीर केले आहे. हा विजयी मेळावा येत्या ५ जुलै ला एन. एस. सी. आय. डोम वरळी येथे होणार आहे. या मेळाव्यात तब्बल १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र दिसणार असल्यामुळे राज्यभरात चर्चांना उधाण आले आहे. तर. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी देखील केली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदार संघ असलेल्या वागळे इस्टेट भागात ठाकरे बंधुंच्या या विजयी मेळाव्याचे बॅनर झळकले आहेत. ठाकरे येत आहेत… अशा आशयाचा हा बॅनर वागळे इस्टेट भागातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी लावला आहे.