Thane Belapur Road Traffic Update: ठाणे, घोडबंदर भागातून हजारो नोकरदार नवी मुंबईत कामानिमित्ताने वाहतुक करतात. पंरतु नवी मुंबई येथील पटणी भागात मध्यरात्री झालेल्या अपघातामुळे मंगळवारी ठाणे- बेलापूर मार्गावरील वाहतुक जवळपास ठप्प झाली. नवी मुंबईतील पटणी भागात ठाण्यातील विटावा, कळवा, साकेत रोड पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. या वाहतुक कोंडीमुळे नवी मुंबईत निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले. पहाटेपासून ही वाहतुक कोंडी कायम असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. वाहतुक कोंडीचा परिणाम नवी मुंबई येथून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांनाही सहन करावा लागला.
ठाण्याहून नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करणारे वाहन मध्यरात्री पटणी जवळील दुभाजकाला धडकला. वाहन अवजड असल्याने तसेच वाहतुकीची वर्दळ असल्याने हे वाहन बाजूला करण्यात आले नाही. त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर झाला. पटणी, विटावा, कळवा, पूल, खारेगाव रोड, साकेत रोड, कोर्ट नाका भागात मोठी वाहतुक कोंडी झाली. त्यामुळे कळवा मार्गे नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला. सकाळी ९.३० नंतरही वाहतुक कोंडी सुटली नव्हती.
नोकरदारांचे हाल
नवी मुंबईतील दिघा, ऐरोली, रबाळे भागात मोठ्याप्रमाणात आयटी कंपन्या आणि कंपन्यांची कार्यालये आहेत. त्यामुळे ठाणे शहरातून कळवा मार्गे नवी मुंबईतील दिघा, ऐरोली, रबाळे येथे कामानिमित्ताने निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले. अवघ्या १५ मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना सुमारे एक तास लागत होता. अनेक बसगाड्या देखील कोंडीत अडकल्या होत्या. काही प्रवाशांना पायपीट करण्याची वेळ आली.

