ठाणे : दिवा परिसरातील बेतवडे येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या तब्बल ३ हजार ८४ परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पाला आता गती मिळणार आहे. गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडलेल्या या प्रकल्पासाठी ठाणे महानगरपालिकेने अखेर बांधकामाची निविदा काढली आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बेतवडे येथील घरांच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ‘सर्वांसाठी घरे-२०२२’ या उपक्रमांतर्गत दिवा येथील बेतवडे परिसरातील सर्वे क्रमांक ७८ आणि १५/१ या दोन भूखंडांवर हा गृहप्रकल्प उभारण्यात येणार आहे. या दोन्ही भूखंडांवर मिळून एकूण ३,०८४ सदनिका प्रस्तावित आहेत. सर्वे क्रमांक ७८ येथे २ हजार ४८०, तर सर्वे क्रमांक १५/१ येथे ६०४ सदनिका उभारण्यात येणार आहेत. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे ७५० कोटी १३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीला तो खासगी लोकसहभाग अर्थात पीपीपी पद्धतीने राबविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

त्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १ हजार ४४१ घरांची उभारणी करण्याचे नियोजन होते. त्यापैकी १ हजार २५३ घरे पात्र लाभार्थ्यांना अल्पदरात उपलब्ध करून देण्यात येणार होती, तर १८८ सदनिका प्रकल्पबाधितांसाठी प्रस्तावित होत्या. मात्र निविदा काढूनही बांधकाम व्यावसायिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अटी व शर्तींमध्ये बदल करूनही निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर पीपीपी पद्धतीचा प्रस्ताव मागे घेऊन संपूर्ण प्रकल्प महापालिकेच्या माध्यमातून पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

आता हा प्रकल्प ईपीसी पद्धतीने राबविण्यात येणार आहे. ईपीसी म्हणजे अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम. सोप्या भाषेत सांगायचे तर प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यापासून आवश्यक साहित्याची खरेदी आणि प्रत्यक्ष बांधकाम पूर्ण करण्यापर्यंतची संपूर्ण जबाबदारी निवड झालेल्या कंत्राटदाराकडे देण्यात येते. त्यामुळे पीपीपी पद्धतीप्रमाणे खासगी विकासकाला प्रकल्प विकसित करण्याची मुभा देण्याऐवजी महापालिका प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊन कंत्राटदाराकडून नियोजित घरे बांधून घेणार आहे. या बदलामुळे संपूर्ण जागेचा वापर घरबांधणीसाठी करता येणार असून, त्यातून पूर्वीच्या प्रस्तावापेक्षा अधिक घरे उपलब्ध होणार आहेत.

महापालिकेने आता या कामासाठी ऑनलाइन निविदा मागविल्या आहेत. ३० सप्टेंबरपासून निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, २१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत निविदा सादर करता येणार आहे. निविदापूर्व बैठक ८ ऑक्टोबर रोजी होणार असून, प्रक्रिया शक्य झाल्यास २३ ऑक्टोबर रोजी निविदा उघडण्यात येणार आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराची नियुक्ती करून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे.

या प्रकल्पातील घरे प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पात्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वार्षिक उत्पन्नाची निर्धारित मर्यादा आणि कुटुंबाच्या नावावर देशात कुठेही पक्के घर नसणे यांसारख्या निकषांनुसार पात्र लाभार्थी निश्चित करण्याची प्रक्रिया महापालिकेच्या माध्यमातून केली जाणार आहे. योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुदानाचाही लाभ मिळणार आहे.

बेतवडे येथील या प्रकल्पामुळे दिवा परिसरात मोठ्या संख्येने परवडणारी घरे उपलब्ध होणार असून, घरांच्या वाढत्या गरजेच्या पार्श्वभूमीवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. अनेक वेळा निविदा काढूनही प्रतिसाद न मिळाल्याने रखडलेला हा प्रकल्प आता ईपीसी पद्धतीने पुढे नेण्याचा निर्णय आणि त्यानंतर काढण्यात आलेली नवी निविदा यामुळे प्रत्यक्ष बांधकामाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.