ठाणे : ठाणे जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. पावसामुळे ठाणे, भिवंडी शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. तर, ठाण्यात अनेक ठिकाणी वृक्षांची पडझड झाली. काही भागात वृक्ष घरांवर पडल्याने नागरिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले.
रविवारी सकाळपासूनच ठाणे शहरात पावसाने हजेरी लावली. दिवसभरात शहरात सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत ६७.०१ मिमी पावसाची नोंद झाली. सततच्या पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी वृक्ष घरांवर पडल्याने घरांचे नुकसान झाले. तसेच, जीर्ण व धोकादायक इमारतींचे काही भाग कोसळल्याच्या घटनाही घडल्या. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नव्हते.
शहरातील अनेक भागात पाणी साचले होते. भिवंडी शहरातही पावसाचा जोर कायम राहिल्याने अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. काही सखल भागांतील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची गैरसोय झाली. विशेषतः नदीकाठील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सर्वाधिक फटका बसला. घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे काही कुटुंबांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने नातेवाईकांकडे तात्पुरता आसरा घेतला. दरम्यान, रविवार असल्याने नागरिक घराबाहेर पडले नव्हते. तरीही मुंबई नाशिक महामार्गावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
