ठाणे : राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशाने भेसळयुक्त अन्नपदार्थाची विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहिम सुरू असतानाच, दोन व्यक्तींनी अन्न व औषध प्रशासन विभागाला बोलवून कारवाई करण्याची धमकी देत एका हाॅटेल व्यवसायिकाकडे ५० हजाराच्या खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशाने भेसळयुक्त अन्नपदार्थाची विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहिम सुरू असून यात भेसळखोरांविरोधात कारवाई केली जात आहे. नागरिकांच्या जीवनाशी निगडीत कारवाई असल्यामुळे मुंढे यांच्या कारवाईचे कौतुक होत आहे. असे असतानाच, आता खंडणीखोरांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला बोलावून कारवाई करण्याची धमकी देत खंडणी वसुल करण्याचे प्रकार सुरू केले असून असाच एक प्रकार भिवंडीत उघडकीस आला आहे.

भिवंडी येथील गौरीपाडा परिसरात मोहम्मद मतलीफ आलम हसीर शेख हे राहतात. ते हाॅटेल व्यावसायिक असून त्यांचे धामणकर नाका येथे ‘साईदीप’ नावाचे हॉटेल आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून नारपोली पोलीस ठाण्यात हितेश पद्माकर मालणकर आणि सिराज या दोघांविरुद्ध नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी एक व्यक्ती त्यांच्या हाॅटेलमध्ये ग्राहक म्हणून आला होता. चहा आवडल्याचे सांगत त्याने वापरल्या जाणाऱ्या चहापावडरची माहिती घेतली आणि पुरवठादाराचा मोबाईल क्रमांकही मिळवला.

त्यानंतरही तो वारंवार हॉटेलमध्ये येऊन चहापावडरची मागणी करत होता. ३० जून रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास तो पुन्हा हॉटेलमध्ये आला. यावेळी हॉटेलमध्ये वापरल्या जाणाऱ्या चहापावडरमध्ये भेसळ असल्याचा आरोप करत, त्याने अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलिसांना बोलावून कारवाई करण्याची धमकी दिली. ही कारवाई टाळायची असेल तर ५० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केल्याचा आरोप मोहम्मद यांनी तक्रारीत केला असून त्याआधारे दोन जणांविरोधात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.