कल्याण : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील वाहन कोंडी मुक्त रस्ते ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ठाणे-भिवंडी-कल्याण ते उल्हासनगर टप्प्यातील भिवंडीतील धामणकर नाका ते कल्याणमधील दुर्गाडी ते उल्हासनगरपर्यंत मेट्रो पाच मार्गिकेतील टप्पा क्रमांक दोन आणि तीनच्या कामाच्या संरेखनास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या दोन टप्प्यातील मेट्रो मार्गिकांचे काम सुरू झाल्यास भिवंडी ते कल्याण हा ३४ किलमीटरचा रस्ते मार्ग वाहन कोंडी मुक्त होण्यास मदत होणार आहे.
‘एमएमआर’ रिजनमध्ये मेट्रोचे जाळे विस्तारण्याच्या कामाच्या शुभारंभ नऊ वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कल्याणमधील फडके मैदानावर करण्यात आला होता. यामध्ये ठाणे-भिवंडी ते कल्याण मेट्रो मार्गाचा समावेश होता. मागील पाच ते सहा वर्षात ठाणे शहर परिसरातील मेट्रो मार्गिका विस्तारण्याचे बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत. आता ही मार्गिका ठाणे ते भिवंडी आणि तेथून कल्याण, उल्हासनगर शहराला जोडण्यात येणार आहे. कल्याणमधील ही मार्गिका यापूर्वी शिवाजी चौक मार्गे पत्रीपूल नेण्याचे प्रस्तावित होते. परंतु, कल्याण शहराबाहेर नागरीकरण झाल्याने या वाढत्या वस्तीचा विचार करून कल्याण शहरातील मेट्रो दुर्गाडी खडकपाडा, बिर्ला महाविद्यालयमार्गे नेण्याची मागणी शिंदे शिवसेनेचे शहरप्रमुख आणि विकासक रवी पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लावून धरली होती. एमएमआरडीए आणि शासनस्तरावर त्यांनी या सुविधेसाठी पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
निविदा प्रक्रियेला प्रारंभ
भिवंडी धामणकर नाका, कल्याण दुर्गाडी ते उल्हासनगर या मेट्रोच्या टप्पा क्रमांक २ आणि ३ च्या संरेखनाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याने लवकरच या कामाच्या निवीदा प्रक्रिया पूर्ण करून ही कामे सुरू केली जाणार आहेत, असे एका मेट्रोशी संबंधित एका शासन अधिकाऱ्याने सांगितले. केंद्र सरकारने संरेखनाला मंजुरी दिल्याची अधिसूचना पाच दिवसापूर्वी प्रसिध्द करण्यात आली आहे. या मेट्रो मार्गातील अडथळ्यांचे सर्वेक्षण यापूर्वीच करण्यात आले आहे. संरेखन प्रक्रियेमुळे हा मेट्रो मार्ग उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मेट्रो सुविधेच्या नावाखाली मागील अनेक वर्षापासून कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील विकासकांकडून पालिकेचा नगररचना विभाग इमारत बांधकाम परवानग्या देताना मेट्रो सेस वसूल करत आहे. या वसुलीमुळे डोंबिवली परिसरातील विकासक नाराज आहेत.
प्रवासाला गती
उल्हासनगर, कल्याण, भिवंडीतून रस्ते मार्गाने प्रवास करताना प्रवाशांना जागोजागी वाहन कोंडी, खड्डे यांचा त्रास सहन करावा लागतो. भिवंडी परिसरात मोठे दळणवळण केंद्र उभे राहिले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या विविध भागातील नोकरदारांना नियमितपणे रिक्षा, बसने प्रवास करताना चढया भाड्याच्या त्रासाला सामोरे जावे लागते. अनेक प्रवासी टप्प्याने प्रवास करून आपले भिवंडीतील कामाचे ठिकाण गाठतात. उल्हासनगर, कल्याण ते भिवंडी मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर भिवंडी परिसरात नोकरीला जाणाऱ्या उल्हासनगर, बदलापूर, कल्याण, शहापूर परिसरातील सर्वांना सुखद प्रवास अनुभवण्यास मिळणार आहे. तसेच, मेट्रो मार्गामुळे रस्ते वाहतुकीवरील वाहन भार कमी होणार आहे.
