ठाणे : डी-मार्ट या सुपर मार्केटमध्ये कुटुंबासह खरेदी करायला गेल्याचा गैरफायदा घेत घरातील लाखो रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मानकोली भागातील एका मोठ्या गृहसंकुलात हा प्रकार उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
भिवंडी येथील मानकोली भागात एका डाॅक्टरच्या घरात हा प्रकार उघडकीस आला. डाॅक्टर हे त्यांच्या तीन लहान मुले आणि पत्नीसोबत २४ मे यादिवशी सकाळी कारने ठाण्यातील ढोकाळी भागातील डी-मार्टमध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी गेले होते. त्याच दिवशी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास ते पुन्हा घरी आले असता, घराचा सुरक्षा दरवाजा उचकटवल्याचे त्यांना आढळून आले.
त्यांनी घरामध्ये प्रवेश केला असता, लाकडी कपाटातील साहित्य खाली पडलेले दिसले. तसेच त्यांना कपाटातील सोन्याचे दागिने देखील गायब झाल्याचे आढळले. यामध्ये १९ हून अधिक तोळ्याचे सोन्याचे दागिने, ३० ग्रॅम चांदीचे दागिने तसेच ३५ हजार रुपयांची रोकड असा एकूण ८ लख ६२ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. याप्रकरणी संबंधित डाॅक्टरांनी नारपोली पोलीस ठाणे गाठल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
मानकोली भागातील मोठ्या गृहसंकुलामध्ये हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भर दिवसा चोरीचा हा प्रकार घडल्याने सुरक्षा रक्षक काय करत होते असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
