ठाणे : अवघ्या दोन दिवसांच्या पावसाने ठाणे आणि भिवंडीतील रस्त्यांची पुन्हा एकदा खड्ड्यांमुळे चाळण होण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे आणि भिवंडी शहरात अनेक मुख्य चौकातील रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी आणि वाहनांची चाके आदळत असल्याने आर्थिक भुर्दंड देखील प्रवासांना सहन करावा लागत आहे. ठाणे महापालिकेने काही ठिकाणी खड्डे बुजविण्यास सुरुवात केली. परंतु खड्डे बुजविल्यानंतर रस्त्याचा पृष्ठभाग असमान झाला आहे.
ठाणे, भिवंडी शहरातून हजारो नोकरदार, व्यवसायिक शहरातील अंतर्गत आणि मुख्यमार्गांवरून प्रवास करतात. ठाणे शहरातील काही रस्ते ठाणे महापालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) विभागाकडे आहेत. तर भिवंडीतील अंतर्गत रस्ते भिवंडी महापालिकेद्वारे बुजविले जातात.
परंतु मागील दोन ते तीन दिवसांच्या पावसामुळे शहरात खड्ड्यांचे साम्राज्यही निर्माण झाले आहे. ठाणे शहरातील कापूरबावडी, मानपाडा, गोल्डन डायज नाका, घोडबंदर येथील मानपाडा उड्डाणपूल, साकेत- बाळकूम रोडचा काही भाग, वागळे इस्टेट, सावरकरनगर येथील अंतर्गत मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. ठाणे शहरातील काही खड्डे महापालिकेकडून बुजविले जात आहेत. परंतु खड्डे बुजविल्यानंतर रस्त्याचा पृष्ठभाग असमान होत आहे. त्यामुळे खड्डे बुजविल्यानंतरही धोकादायक प्रवास वाहन चालकांना करावा लागतो.
भिवंडी शहरातील चित्र ठाण्यापेक्षा विदारक आहे. भिवंडी येथील दिवंगत आनंद दिघे स्मारक चौक, राज्य परिवहन सेवेचा (एसटी) आगार परिसर, भिवंडी न्यायालयाबाहेरील मार्ग, वंजारपट्टी, कल्याण रोड, कोनगाव चौक, गोवा नाका, जय मल्हार उपाहारगृह परिसर, साईबाबा रोड, काल्हेर चौक, जलवाहिनी मार्ग, कोपर, पूर्णा, अंजुर चौक, अंजुरफाटा ते वसई मार्ग, वळपाडा या भागात काही ठिकाणी मोठे तर काही ठिकाणी लहान आकाराचे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीमुळे इंधन खर्च तसेच वेळेचा अपव्यय होत असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे. अनेकदा वाहनाचे चाक खड्ड्यात आदळून वाहनांचे देखील नुकसान होत असल्याचेही वाहन चालकांचे म्हणणे आहे.
ठाणे ते भिवंडी प्रवास करणे कठीण झाले आहे. अनेकदा खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी झाल्यास अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी किमान दीड तास लागतो. भिवंडीत काही ठिकाणी मोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचते. त्यामुळे प्रवास धोकादायक झाला आहे.- योगेश गांगुर्डे, प्रवासी.
