ठाण्यातील कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैद्यकीय, औद्योगिक आदी विविध क्षेत्रांतील दीडशेहून अधिक संस्थांनी एकत्रित येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात शनिवारी पार पडलेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीमधील प्रश्नांना शिंदे यांनी उत्तरे दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आम्ही बिहारमध्ये नितीश कुमार यांचे आमदार कमी असताना त्यांना मुख्यमंत्री बनवले आणि तुमचे ५० आमदार असताना तुम्हाला मुख्यमंत्री बनवले. मग आम्ही त्यावेळी शिवसेनेला शब्द दिला असता तर, तो फिरवला असता का?, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला सांगितले.”, असे विधान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात कार्यक्रमात बोलताना केले. तसेच, आगामी सर्व निवडणूका भाजपा-शिवसेना युतीत लढविणार असून त्याचबरोबर लवकरच अयोध्येला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

…त्याचा आम्ही आनंदही साजरा करु शकलो नाही –

“मुंबई राज्यापासून कोणीच वेगळी करु शकत नाही. पण, त्याचा काही जण राजकीय फायदा घेत आहेत. राम मंदिर उभारणे आणि ३७० कलम हटविणे, ही बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. दोन्ही कामे झाली आहेत. ३७० कलम रद्द झाले पण, माविआमध्ये होतो त्यामुळे त्याचा आम्ही आनंदही साजरा करु शकलो नाही.”, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

…तर शिवसेनेचे काय झाले असते, हे ज्योतिषाला विचारण्याची गरज नाही –

तसेच, “सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी राज्याचा मुख्यमंत्री व्हायचे नाही का? जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेत त्यांनीच मुख्यमंत्री व्हायचे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पातळी सोडून बोलण्याचा आणि दुसऱ्यांवर टीका करण्याचा माझा स्वभाव नाही.”, असेही ते म्हणाले. याचबरोबर, “आम्ही जो मार्ग आम्ही पत्कारलेला आहे, तो बाळासाहेबांच्या भूमिकेचा मार्ग आहे. बाळासाहेबांची अनेक भाषणे आहेत. त्यात त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांसोबत कधी जायची वेळ आली तर दुकान बंद करेन, असे म्हटले होते. आम्ही त्यांचे विचार पुढे नेतोय, मग आम्ही काय चुकीचे केले?.”, असेही त्यांनी म्हटले. तर, “या दोन्ही पक्षांसोबत अद्यापही सत्तेत राहिलो असतो, तर शिवसेना पक्षाचे काय झाले असते, हे ज्योतिषाला विचारण्याची गरज नाही. आता घेतलेली भूमिका आम्ही अडीच वर्षांपूर्वीच घेतली पाहिजे होती, आम्ही विश्वासघात केला नाही.”, असेही विधान त्यांनी केले.

मी स्वतःला कार्यकर्ता समजतो –

“आम्ही राज्यसभा आणि विधान परीषदेला प्रामाणिकपणे मतदान केले. पण समोरच्यांनी नाही केले आणि चुकीचा माणूस पडला, असे सांगत त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. आजचा झालेला सत्कार मी बाळासाहेब आणि आनंद दिघे यांना समर्पित करतो. आम्ही जे काही पाऊल उचलले आहे. त्याला नागरिकांनी केलले स्वागत हेच उत्तर आहे. अन्याय होईल तिथे आवाज उठवा लढा अशी शिकवण बाळासाहेब आणि आनंद दिघे यांची होती. मी मुख्यमंत्री पदासाठी हे पाऊल उचलल नाही. मला आजही मी मुख्यमंत्री आहे असे वाटत नाही. मी स्वतःला कार्यकर्ता समजतो. समाजातील प्रत्येक घटक सुखी राहवा हीच इच्छा आहे.”, असेही ते म्हणाले.

मुंबईतील सर्व रस्ते सिमेंट कॉक्रीटचे करून शहर खड्डे मुक्त करणार –

“पुढच्या अडीच वर्षात मुंबईतील सर्व रस्ते सिमेंट कॉक्रीटचे करून शहर खड्डे मुक्त करणार आहे. ठाण्यातील तीन हात नाका भागात ग्रेड स्प्रेटर, अवजड वाहतुकीसाठी पर्यायी रस्ते आणि वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आंतरराष्ट्रीय सल्लागार नेमून वाहतूक आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ठाणेकरांची वाहतूक कोंडीतुन सुटका होईल.”, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत – काडसिद्धेश्वर स्वामी

“कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचले. एखाद्या खेड्यातील व्यक्ती राज्याचा मुख्यमंत्री होतो, हेच भारतीय लोकशाही बळ आहे. मुख्यमंत्री शिंदे हे कमी बोलणारे आहेत, पण ते काम करणारे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या हातून समाजातील शेवटच्या घटकाची कामे होवोत आणि सर्वच घटक त्यांच्या कार्याने सुखावतील.”, असा विश्वास कोल्हापूरच्या कणेरी येथील सिद्धगिरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामी यांनी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. तसेच, “अनेकजण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असतात. या कामाच्या तपश्च़र्येतुन सिद्धी प्राप्त होते. तेव्हा त्या व्यक्तीच्या परिश्रमाचा आणि समाजाप्रती असलेल्या योगदानाचा गौरव होतो. अशाचप्रकारे मुख्यमंत्री शिंदे यांचा इथे गौरव होत आहे.”, असेही ते म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane bjp and shiv sena will fight all upcoming elections in alliance eknath shinde msr
First published on: 14-08-2022 at 13:19 IST