ठाणे : ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोर्चे आणि आंदोलने सुरू असल्याने त्यातून निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे ठाणेकर मेटाकुटीला आले आहेत. असे असतानाच, आता आंदोलनाच्या नावाखाली वाढत असलेली अराजकता आणि भीडतंत्राच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने ठाण्यात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला असून यानुसार, येत्या रविवारी (१ नोव्हेंबर) भाजपातर्फे ””लोकतंत्र बचाव”” पदयात्रा काढण्यात येणार आहे.
ठाणे शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने रविवारी ‘लोकतंत्र बचाव’पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. समाजात वाढत असलेली अराजकता आणि आंदोलनाच्या नावाखाली होणाऱ्या गोंधळाच्या निषेधार्थ ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. लोकशाही आणि संविधानाचे रक्षण तसेच शहरात शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी, हा या पदयात्रेचा उद्देश असल्याचे भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी म्हटले आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी प्रदेशातील प्रमुख नेते, ठाणे जिल्ह्यातील आमदार आणि खासदारही सहभागी होणार आहेत. रविवारी सकाळी ९ वाजता पाचपाखाडी येथील परमार्थ निकेतनपासून पदयात्रेला सुरुवात होईल. चंदनवाडी, अलमेडा चौक आणि दगडी शाळा मार्गे ही पदयात्रा तलावपाळी येथे पोहोचेल. तेथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासमोर पदयात्रेची सांगता होईल. त्यानंतर उपस्थित नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, असे लेले यांनी सांगितले. या पदयात्रेत नागरिक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दिल्लीत काँग्रेस आणि सीजेपी आंदोलनाचा निषेध
दिल्लीत काँग्रेस आणि काॅक्ररोज जनता पार्टीसह विरोधी पक्षांकडून आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता पसरवली जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. या आंदोलनांच्या निषेधार्थ भाजपातर्फे देशभरात ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा काढण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यातही या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपच्या नेत्यांकडून देण्यात आली.
