ठाणे – ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून दोन्ही शिवसेनेतील संघर्ष रस्त्यावर आल्याचे चित्र असतानाच, आता आंदोलनांच्या नावाखाली वाढणारी अराजकता आणि भीडतंत्राच्या निषेधार्थ रविवारी भाजपकडून ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या पदयात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार असल्याने ठाण्याच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून ठाण्यात राजकीय वातावरण तापले आहे. या हत्या प्रकरणात शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी पुर्णेकर कुटूंबिय आणि समर्थकांकडून केली जात असून या मागणीसाठी मोर्चे आणि आंदोलने केली जात आहेत. त्यास उबाठा, मनसे या दोन्ही पक्षांकडून पाठींबा दिला जात आहे.

यावरूनच ठाण्यात सध्या शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष सुरू असून या संघर्षाचा फटका ठाणेकरांना बसत आहे. असे असतानाच, भाजपने आंदोलनांच्या नावाखाली वाढणारी अराजकता आणि भीडतंत्राच्या निषेधार्थ पदयात्रा आयोजित केली आहे. रविवारी हि ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा निघणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. याच पदयात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र सहभागी होणार असल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.

‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रेचा मार्ग

रविवारी सकाळी नऊ वाजता पाचपाखाडी येथील परमार्थ निकेतन येथून पदयात्रेला सुरुवात होईल. चंदनवाडी, अलमेडा चौक आणि दगडी शाळा मार्गे ही पदयात्रा तलावपाळी येथे पोहोचणार आहे. तेथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासमोर पदयात्रेची सांगता होईल. त्यानंतर उपस्थित नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या पदयात्रेत नागरिक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी केले आहे.

ठाणे ठिकाण निवडल्याने चर्चा

समाजात पसरत चाललेली अराजकता आणि भीड तंत्राच्या विरोधात मोर्चा काढत असल्याचे भाजपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. दिल्लीत सुरू असलेल्या वेगवेगळ्या आंदोलनाना उत्तर देण्यासाठी भाजपाकडून हा मोर्चा काढला जात असला तरी यासाठी ठाणे शहर हे ठिकाण निवडण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे, ठाण्यात लोकतंत्र धोक्यात आले आहे आणि येथेही राजकता पसरली आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकत्र येत असल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.